Lokmanthan News

Latest Post


ठाणे : प्रतिनिधी

फटाके फोडण्यास मनाई करणाऱ्यास नाहक मारहाण केल्याच्या दोन घटना गुरुवारी 8 नोव्हेंबर रोजी ठाण्यात विविध ठिकाणी घडल्या.याप्रकरणी,वर्तकनगर आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यशोधननगर येथील शिवशक्ती अपार्टमेंटच्या टेरेसवर पाचव्या मजल्यावर राहणारे महादेव गवळी हे भरदुपारच्या सुमारास फटाके फोडत होते.हे फटाके थेट खालील मजल्यावरील घराच्या खिडकीतून घरात येत असल्याने तिसऱ्या मजल्यावरील रहिवाशी रुपेश गोसावी आणि श्रीमती सावंत यांनी फटाके फोडण्यास मनाई केला.याचा राग आल्याने महादेव गवळी आणि त्याचे वडील विश्वनाथ गवळी यांनी गोसावी यांना कानाखाली मारून टेरेसवर ढकलल्याने त्यांचा उजवा हात खांद्यातून निखळला.जखमी झालेल्या गोसावी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून गवळी पिता-पुत्रावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या घटनेत,वागळे इस्टेट,संत ज्ञानेश्वरनगर येथे घरासमोर फटाके फोडण्यास मनाई केल्याच्या रागातून त्याच परिसरातील निखील या 19 वर्षीय युवकाने रामतीर्थ गुप्ता या रहिवाश्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.ही घटना 8 नोव्हे.रोजी रात्री घडली.नाकाला जखम झाल्याने गुप्ता यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली.


ठाणे : प्रतिनिधी

ठाण्यात "मिथिला अनेक्स" या कपड्याच्या दुकानातील सिलिंगच्या सिमेंटचा पत्रा तोडून भगदाड पाडून दुकानातून लेडीजचे पंजाबी ड्रेस कुर्तीज लेगीन्स तसेच कस्टमरचे ऑल्टर करण्यासाठी दिलेल्या एकूण 35 हजार किमतीच्या कपड्याच्या सामानाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे स्टेशन जवळ बापट लेन येथे राजुल नितीन परमार ह्या लेडीजचे कपडे विकण्याचे "मिथिला अनेक्स" नावाचे कपड्याचे कपड्याचे दुकान आपल्या पतीसह चालवीतात.नेहमीप्रमाणे राजूल यांनी गुरुवारी रात्री 10 वाजता दुकान बंद करून घरी गेल्या असताना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता त्यांचे पती नितीन यांनी दुकान उघडले तेव्हा त्यांना दुकानातील भिंतीलगतच पत्रा तुटलेला व त्यास भगदाड पडलेले दिसले सिमेंटचा पत्रा याचा काही भाग जमिनीवर पडला होता. दुकानातील कपडे अवास्तव पडलेले दिसले. यामध्ये दुकानातील 35 हजार किमतीचे कपडे चोरीला गेल्याची तक्रार राजुल यांनी शुक्रवारी ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे . तसेच परमार यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांचे दुकानाच्या बाजूला युसूफ रशिद खान यांचे लिटिल स्टार सायकल मार्ट आणि राहुल रघुनाथ चांग यांचे बालाजी स्टेशनरी आणि झेरॉक्स या दुकानात चोरी झाल्याचे पोलिसांना कळविले आहे.याप्रकरणाचा पुढील तपास ठाणे नगर पोलीस करीत आहेत.
ठाणे : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या कालावधीनंतर अवेळी फटाके फोडणाऱ्या चौघाविरुद्ध ठाणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.तुषार सोनार (21)आणि सोमनाथ कांबळे (20),रवी गोटवानी (30) या तिघांसह अन्य एकावर अनुक्रमे चितळसर,कापूरबावडी,कासारवडवली आणि शिवाजीनगर (अंबरनाथ) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 131 नुसार 22 जणांविरोधात कारवाई करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडण्याला परवानगी दिली आहे.निर्धारित कालवधीनंतर फटाके फोडले जात असल्याने ठाणे पोलिसांनी कलम 188 प्रमाणे कारवाईला सुरूवात केली.त्यानुसार,घोडंबदर येथील चितळसर पोलीस ठाण्यात तुषार सोनार याच्याविरोधात तर कापूरबावडी पोलीस ठाण्यात सोमनाथ कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर,शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घोडबंदर रोडवरील स्वस्तिक गृहसंकुलात फटाके फोडणाऱ्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात आणि अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अन्य एकावर असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान,22 जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. यात डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्यात 8,विष्णुनगर पोलीस ठाण्यात 6,उल्हासनगरमध्ये 3 आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात 5जणांवर कारवाया करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. अवेळी फटाके फोडणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हे – 22 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई


श्रीगोंदे (प्रतिनिधी)ः दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर बेलवंडी रेल्वे स्थानकाच्या मुख्य मार्गालगतच्या ‘आउटर’वर थांबलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसमधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेले. या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून गोंदियाकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस दौंड-मनमाड रेल्वे मार्गाने जात होती. पहाटेच्या सुमारास ही गाडी बेलवंडी रेल्वे स्थानकावर थांबली. सिग्नल नसल्यामुळे मुख्य मार्गालगतच्या ‘आउटर’वर गाडी थांबलेली होती. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी झोपलेले होते. त्याचवेळी काही चोरट्यांनी थांबलेल्या रेल्वेतील जनरल डब्यात खिडकीच्या बाजूने बसलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. दागिने ओरबडल्यामुळे महिलांना जाग आली. त्यांनी आरडाओरड करताच चोरटे पसार झाले. काही वेळानंतर सिग्नल मिळताच रेल्वे मार्गस्थ झाली.

महाराष्ट्र एक्स्प्रेस नगरला पोहोचल्यानंतर दोन महिलांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र लांबविल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी बेलवंडी रेल्वे स्टेशन येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.


बेंगळुरू : भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार (वय 59) यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. 59 वर्षाच्या अनंत कुमार यांना कॅन्सर झाल्याने ते रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बेंगळुरूमध्ये त्यांनी अखरेचा श्‍वास घेतला. अनंत कुमार हे बेंगळूरूमधून सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मोदी यांनी या ट्विटमध्ये आमचे सहकारी आणि एक चांगला मित्र सोडून गेल्याने दु:खी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्र परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहे. त्यांनी भाजप पक्षाला कर्नाटक राज्यात मोठे बळ दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अनंतकुमार यांच्या निधनाबद्दल देशात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला.


बिलासपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये केलेल्या भाषणात सोनिया गांधी-राहुल यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर कडवट टीका केली. नोटबंदी, नक्षलवाद, विकास आणि कांग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करून, मोदी म्हणाले, की नोटाबंदीमुळे आई-मुलगा पैशांची हेराफेरी करून जामीनावर फिरत आहेत. ते नोटाबंदीचा हिशेब मागतात; पण नोटशबंदीमुळेच नकली कंपन्या बंद पडल्या आणि तुमचा खेळ समोर आला. तुम्हाला जामीन घ्याला लागला. 

नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी जामिनावर आहेत. मोदी यांच्या बोलण्याला हा संदर्भ होता. पहिल्या टप्प्यातील 18 जागांसाठी मतदान होत आहे. जेव्हा तारखा जाहीर झाल्या, तेव्हा लोक म्हणाले, सणांचा काळ आहे निवडणुकीत रंगत येणार नाही; पण लोकांमध्ये मतदानाबाबात प्रचंड उत्साह आहे, असे त्यांनी नमूद केले. मतदान लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. लोकांनी विक्रमी मतदान करायला हवे. पुरुष आणि महिलांत कोण जास्त मतदान करणार, याची चढाओढ पाहिजे. महिलांनी पुरुषांना मागे टाकावे, असे आवाहन त्यांनी केले. 

मला विश्‍वास आहे, की बॉम्ब, बंदूक दाखवणार्‍यांना लोकशाहीची शक्ती प्रत्युत्तर देईल. आमच्या विरोधी पक्षांना भाजपला टक्कर कशी द्यायची, हेच समजत नाही.
काँग्रेसचे राजकारण एका कुटुंबापासून सुरू होते आणि तिथेच संपते. आमचे गरीबाच्या झोपडीपासून सुरू होते आणि त्याच्या जीवनात बदल घडवून आणल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही, असे ते म्हणाले. 
आम्हाला वारंवार छत्तीसगडची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्याचे एक कारण म्हणजे येथील जनता आणि सरकार यांच्यात संघटना आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. सर्व मिळून राज्याच्या विकासासाठी झटत आहेत, असे सांगून मोदी म्हणाले, की एका कुटुंबातील तिसर्‍या पिढीचे पंतप्रधान (राजीव गांधी) म्हणाले होते की, दिल्लीहून 100 पैसे निघतात आणि जमिनीपर्यंत 15 पैसेच पोहोचतात. हा पैसा कोणता पंजा खातो? हेच माहिती नव्हते. नोटाबंदीने हे 85 पैसे बाहेर काढले.


संगमनेर (प्रतिनिधी)ः पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन, तिच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिचा खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्‍वर येथे मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्रकाश नामदेव धांडे (वय 33) असे आरोपीचे नाव असून तो पोलिसाचा मुलगा आहे. शांता प्रकाश धांडे (वय 31) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
शांता आणि प्रकाश धांडे यांचा सहा महिन्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्‍वर येथील मंदिरामध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर हे दांपत्य श्रीगोंदे येथे वसतिगृहात कामाला होते. तेथे आरोपी प्रकाश हा पत्नीवर सातत्याने संशय घेत होता. गेल्या आठवड्यात शांताची आई गंगुबाई महादू तिटकारे या शिव (मुंबई) येथे आजारी असल्याने हे दोघेही त्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. त्या वेळी तेथे अन्य नातेवाईकदेखील आलेले होते. याच दरम्यान शांताने आपला पती चारित्र्याचा संशय घेत असल्याची तक्रार आईकडे केली. तसेच यासंबधी घारगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या आपल्या सासर्‍यालादेखील माहिती दिल्याचे तिने सांगितले. तसेच पतीला समजावून सांगण्यास आईला सांगितले. आईने यासंदर्भात सासर्‍याशी बोलते, असे सांगत तिची समजूत काढली होती.

प्रकाश याच्या आजीचा दहावा आंबेवंगण (ता. अकोले) येथे सोमवारी असल्याने प्रकाश, त्याची पत्नी शांता, सासू गंगुबाई, दोन साडू आणि दोन मेव्हण्या यांच्यासह जवळे बाळेश्‍वर येथील साडू बाळू घोडे यांच्या घरी मुक्कामासाठी रविवारी आले होते. रात्री जेवणानंतर हे सर्वजण झोपी गेल्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या विचित्र आवाजामुळे प्रकाशची मेव्हणी कांता झोपेतून जागी झाली. तिने आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता तिची बहिण रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्याचे दिसल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले. शांता हिच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. तसेच तेथे रक्ताने माखलेला दगडी पाटा आढळून आला. शांताचा पती तेथून गायब झाला होता. घटनेची माहिती मिळताच घारगावचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रकाशला संगमनेर शहरातील वडील राहत असलेल्या पोलीस कॉलनीच्या घरासमोरून अटक केली. प्रकाशने स्वतःच्या शरीरालाही धारदार हत्याराने इजा करून घेतली. पोलिसांना त्याला ताब्यात अटक केली. त्याच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 


statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget