0


पालघर,दि.29  : पालघर जिल्हापरिषदेने 129 शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात कल श्रमजीवीने काढलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. विद्यार्थ्यांनी केलेल्या दप्तर घ्या ,बकर्‍या द्या या मागणीचा संदर्भ घेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर तोफ डागली. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन नुसार उपस्थित केलेल्या या प्रश्‍नावर उत्तर देत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सीईओ पालघर यांचे आदेश रद्द करत शाळा सुरूच राहतील असे स्पष्ट केले. विद्यार्थी, पालक आणि श्रमजीवी यांच्या आंदोलनाचा हा मोठा विजय असल्याने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी आदिवासी भागातील तीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 129 प्राथमिक शाळा बंद करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्यावतीने काल शेकडो विद्यार्थी दप्तर घ्या बक-या द्या अशी मागणी करत पालघर जिप मुख्यालयात मोर्च्याने गेले होते. महाराष्ट्र विधानसभेचे आजचे कामकाज विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी पाँईंट ऑफ इन्फॉर्मेशन या आयुधाचा वापर करत हाच प्रश्‍न उपस्थित करून सुरू केले. त्यांनी कालच्या श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्च्याचा संदर्भ देत शिक्षण मंत्र्यांकडे जाब मागितला. त्यावर त्वरित शासनाचे शाळा बंद करण्याचे धोरण कधीच नव्हते. अधिका-यांनी घाईत हा निर्णय घेतला असेल. तो तात्काळ रद्द करतो असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहिर केले.
पालघरच्या सीईओ निधी चौधरी यांनी सरकारला अंधारात ठेवत इतका मोठा निर्णय घेतलाय कसा याबाबत सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सीईओ चौधरी यांच्या या निर्णयामुळे आदिवासी ग्रामीण पालकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. निधी चौधरी यांनी आदिवासी मुलांचे शिक्षण हक्क पायदळी तुडविल्याने त्यांच्यावर गंभीर कारवाई करावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने आता मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Post a Comment

 
Top