Breaking News

पुण्यात स्पावर छापा; थायलंडच्या 5 तरुणींची सुटका

पुणे, दि. 30, जुलै - काही हौसी नागरिक खास मजा लुटण्यासाठी बँकॉक, थायलँड आणि पटायासारख्या देशांचे दौरे करतात. टुरिस्ट कंपन्यांही त्यांची पसंती  लक्षात घेऊन यासाठी पॅकेज टुर आखतात. या पॅकेज टुर दोन-अडीच लाखापर्यंत असतात. मात्र अनैनिक व्यवसायातील दलालांनी स्पाच्या नावाखाली अवघ्या दोन  हजारांत थायलंडची खास सेवा देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. अशाच एका स्पावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी रात्री छापा टाकला. यात  थायलंडच्या 5 तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. यातील एक मुलगी टुरिस्ट व्हिसावर तर चार मुली बिझनेस व्हिसावर आल्याचे तपासात उघड  झाले.  याप्रकरणी सामाजीक सुरक्षा विभागाने पिंपळे सौदागर येथील चिवा स्पा सेंटरचा मालक अमोल खंडू जाधव (31,रा.कोकणे चौक, पिंपळे सौदागर) आणि  व्यवस्थापक दिलू गुआनबे जिबाहो (21,रा.नागालँड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुध्द सांगवी पोलिस ठाण्यात ईपटा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला  आहे.
गुन्हे शाखेतील पोलिस नाईक नितीन लोंढे यांना पिंपळे सौदागर येथील शिवार गार्डन चौकातील फॉरच्युना इमारतीत चिवा स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरु  असल्याची खबर मिळाली होती. मसाज सेंटरच्या नावाखाली थायलंडच्या तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात होता. यासंदर्भात गुन्हेशाखेकडून खातरजमा  करण्यात आल्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला. यावेळी थायलंड देशाच्या पाच तरुणींची सुटका करण्यात आली. या मुलींना नोकरीचे तसेच जादा पैशाचे  आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात होता. यातील एक तरुणी टुरिस्ट तर चौघी बिझनेस व्हिसावर भारतात आल्या होत्या. मागील तीन महिन्यांपासून  त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात होता. तीन महिन्यापुर्वीही बाणेर परिसरात कारवाई करुन पाच थायलंडच्या मुलींची सुटका करण्यात आल्याचे  पोलिसांनी सांगितले. या स्पा सेंटरमध्ये 1200 ते 1500 रुपयांमध्ये मसाज सेवा दिली जात असे तर इतर सेवेसाठी दोन हजार रुपये घेतले जात होते.