Breaking News

कांदाटी खोर्‍यात गव्याच्या हल्ल्यात एक जखमी

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : महाबळेश्‍वर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कांदाटी खोर्‍यात शेतात वैरण कापताना एकावर गव्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत रमेश धोंडिबा ढेबे (वय 23, रा. पर्वत, ता. महाबळेश्‍वर) हा युवक गंभीर जखमी झाला. या परिसरात गव्यांचे वास्तव्य वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. 
गेले आठ दिवस संततधार पाऊस सुरु असल्याने या भागातील लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. दावणीला बांधलेल्या मुक्या जनावरांना चारा आणण्यासाठी सकाळी रमेश शिवारात गेला होता. खाली वाकून चारा कापत असतांना पाठीमागून गव्याने त्याला जोरदार धडक दिली. यामध्ये गव्याचे शिंग रमेशच्या छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या विव्हळण्याच्या आवाजाने शेजारील लोक जमा झाले. त्यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.