Breaking News

नितीशकुमांराचे भाजपप्रेम

दि. 28, जुलै - “नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत बिहारच्या राजकारणात भुकंप घडवून आणला असला तरी, नितीशकुमारांनी तिसर्‍या आघाडीच्या  राजकारणाला खो देत आपण विश्‍वासार्ह नसल्याचे दाखवून दिले. तिसर्‍या आघाडीचा भविष्यातील पंतप्रधान यापासून आपसुकच नितीशकुमार दूर जातांना दिसून येत  आहे. नितीशकुमार यांनी भाजपाशी जवळीक साधत, 15 तास उलटत नाहीत तोच पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाशी शपथ घेतल्यामुळे नितीशकुमार यांचे भाजपप्रेम  लपून राहिले नाही.’’ 
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काही तास उलटत नाही तोच, पुन्हा भाजपच्या पाठिब्यांवर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत.  नितीशकुमारांच्या या पावित्र्यामुळे बिहारमधील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र नितीशकुमारांच्या या पावित्र्यामुळे पुढील काही दिवस लालू प्रसाद व त्यांच्या  कुटुंबियांसाठी चांगले नसणार, यात शंका नाही. नितीशकुमार यांनी राजद सोबत काडीमोड घेतल्यामुळे त्यांना खुर्चीचा कोणताही धोका नाही. तर भाजपा सत्तेत  सहभागी झाल्यामुळे, बिहारमध्ये आपले संघटन करण्यासाठी भाजपा या सत्तेचा पुरेपुर वापर करून, राजदचे पुर्ण खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील, यात संशय  नाही.  बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, जनता दल(यू)आणि काँगे्रस या संयुक्त पक्षांनी सरकार स्थापन केले होते. वास्तविक बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांना  सर्वाधिक 80 सीट मिळाले होते, तर जदयू ला 71 तर काँगे्रसला 23 सीट मिळाल्या होत्या. भाजपाला पराभव चाखत 53 जागांवर समाधान मानावे लागले होते.  नितीशकुमार यांची स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक कारभार ही बिहारच्या राजकारणांची जमेची बाजू होती. मात्र नितीशकुमार असा राजकीय भुकंप करतील अशी  अपेक्षा कोणी ही केली नव्हती. मागील काही दिवंसापासून लालू प्रसाद यादव यांच्या मालमत्तेवर सीबीआयचे व ईडीचे पडणारे छापे, यामुळे लालु यांची डोकेदुखी  वाढली होती. तसेच यावेळी संपूर्ण कुटुंब गोत्यात आल्यामुळे लालू हैराण होते. अशावेळी तेजस्वी यादव यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यास अटकेची टांगती  तलवार डोक्यावर होतीच. त्यामुळे लालू, तेजस्वी यांचा राजीनामा देण्यास नकार देत होते. तर नितीशकुमार यांना आपली प्रतिमा जपायची होती. भ्रष्टाचाराचे आरोप  असलेल्या सोबत सत्तेत सहभागी राहायचे हे मुख्यमंत्री नितीशकुमाांनी ठरविले होतेच. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपाला जवळ केले होते, आणि  भाजपाला देखील तेच हवे होते. नितीशकुमारांनी जर महायुती तोडली तर, भाजपासोबत नितीशकुमारांना सत्ता स्थापन करणे, आणि प्रतिमा जपणे सोयीस्कर जाणार  होते. नितीशकुमार भाजपाची मदत घेणार असल्यामुळे नितीशकुमारांना यापुढे भाजपा वगळता इतर पक्ष विश्‍वासार्ह मानणार नाही. देशभरात विरोधकांकडे  नितीशकुमारांसारखा अभ्यासू, आणि स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींचा अभाव आहे. अशावेळेस नितीशकुमार देशभरातील काँगे्रससह विविध घटकपक्षांचे राष्ट्रीय स्तरावर  नेतृत्व करू शकत होते. तसेच विरोधकांकडून ते पंतप्रधानपदांचे उमेदवार देखील होऊ शकत होते. मात्र नितीशकुमार भाजपाच्या कळपात सामील होत विरोधकांच्या  भविष्यातील घडामोडीवर वरंवटा फिरविला. असे असले तरी लालू प्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर केलेले आरोप धक्कादायक आहेत.तसेच रात्री अडीच  वाजता तेजस्वी यादव यांनी राजभवनावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला. राजद हा राज्यातील सर्वात माठा पक्ष असतांना राज्यपालांनी त्यांना बहूमत सिध्द  करण्यासाठी न बोलावता, नितीशकुमारांना संधी दिल्यामुळे हा मुद्दा न्यायपालिकेत गाजण्याची शक्यता आहे. कारण तेजस्वी यादव यांनी राज्यपालांच्या या  निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचे संकेत दिले आहेत. जनता दल (यू) व भाजप आपले बहूमत सिध्द करणार असल्यामुळे न्यायालयात या केसला महत्व उरणार  नाही. तेच जदयूने भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात जदयू ला स्थान मिळणार आहे. तसेच भाजपा आपली पाळेमुळे बिहारमध्ये पक्की  करण्यासाठी सर्व शक्ती लावणार असल्याचे यावरून दिसून येते.मात्र राजद आणि जदयू मधील संघर्ष यामुळे विकोपाला गेला असून पुढील काही दिवसांत बिहारच्या  राजकारणात मोठा संघर्ष आणि राजकीय घडामोडी बघायला मिळत आहे.