0

हैदराबाद, दि. 30, जुलै - विवो प्रो कबड्डी लीगमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात तेलगू टायटन्सला घरच्या मैदानावर दुसर्‍याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीच्या संघाने जयपूर पिंक पँथर्सवर मात केल्याने दुसरा सामनाही  तितकाच रंगतदार होईल अशी सर्वांची आशा होती. त्यातच प्रो-कबड्डीच्या इतिहासात सर्वोत्कृष्ठ रेडर म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदीप नरवाल आणि राहुल चौधरी यांचा खेळ कबड्डीपे्रमींना पाहण्यास मिळाला. सामन्याच्या पहिल्या सत्रात राहुल चौधरीने काही सुरेख पॉईंट मिळवत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार प्रदीप नरवालला संघाबाहेर बसवण्यात तेलगूचे खेळाडू यशस्वी झाले. मात्र पटणा पायरेट्सने तितक्याच जोरात कमबॅक करत सामन्यात एका गुणाची आघाडी घेतली.
अखेरच्या सत्रात पटण्याचा मुंबईकर बचावपटू विशाल मानेने घेतलेल्या सुरेख पॉईंटचा संघाला फायदा झाला. विशाल मानेने विशेषकरुन राहुल चौधरीला टार्गेट करत  आपल्या डॅशने त्याला मैदानाबाहेर केलं.
दरम्यान दुसर्‍या सामन्यात दबंग दिल्लीने निलेश शिंदे आणि मेराज शेख यांच्या अप्रतिम खेळाने मनजित चिल्लरच्या जयपूर पिंक पॅथरला पराभूत केले. इराणीयन खेळाडू मिराज शेखच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या दबंग दिल्लीने अटीतटीच्या लढाईत मनजीत छिल्लरच्या जयपूर पिंक पँथर्सवर  30-26 अशी मात केली आहे.

Post a Comment

 
Top