Breaking News

बोरीसह सुखेडमध्ये वाद्यांच्या गजरात शिव्यांची लाखोली

लोणंद, दि. 30 (प्रतिनिधी) : खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावांदरम्यान नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशी दोन्ही गावांतील महिलांनी गावाच्या मध्यातून वाहणार्‍या ओढ्याकाठी येऊन वाद्याच्या गजरात हातवारे करत एकमेकींना शिव्या देण्याचा बोरीचा बार प्रथेप्रमाणे पाऊण तास भरला. यंदा पाऊस नसल्याने हा बार पाहण्यासाठी ओढ्याच्या दोन्ही तिरांवर व ओढ्यात महिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती. 
नागपंचमीचा दुसरा दिवस उजाडला, की तालुक्यातील महिला व नागरिकांना बोरीच्या बाराची आस लागते. त्यानुसार बार पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिक वाहनांतून सुखेडच्या माळावर दाखल होत होते. दोन्ही गावांतील महिला ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन तुतारी, डफडे, पिपाणी या वाद्यांच्या गजरात झिम्मा-फुगड्या खेळत ओढ्याकाठी दाखल झाल्या. सव्वाबारा वाजता बार सुरू झाला. पहिल्या 10 मिनिटांनंतर पोलिसांनी सर्व वाद्ये बंद करून ओढ्यात उतरून दोन्ही गावच्या महिलांना ओढ्याच्या काठावर नेले. त्यानंतर पाऊण तास हा बार सुरु होता. या वेळी बार घालण्यासाठी ओढ्याच्या दोन्ही तिरावर हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यंदा पाऊस नसल्यामुळे बार भरणारा ओढा कोरडा ठणठणीत असतानाही दोन्ही गावच्या महिलांनी आपला उत्साह तूसभर कायम ठेवला होता. बार घालण्यासाठी तरुण मुली, महिला व वृध्द महिलांचा सहभाग होता. बार घालणार्‍या महिला हातवारे करत एकमेकींना शिव्या-शाप देत होत्या, तसेच एकमेकींना खांद्यावर उचलून घेऊन एकमेकींकडे त्वेषाने बघत हुर्रेचा नारा देत होत्या. पाऊण तासानंतर बार संपला. त्या वेळी दोन्ही गावांतील महिला आपापल्या गावात जाऊन ग्रामदैवतेसमोर पारंपरिक खेळात रंगून गेल्या.
लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप भोसले यांनी सातारा मुख्यालयातून महिला पोलीस कर्मचारी व अन्य पोलीस ठाण्यातून महिला व पुरुष कर्मचारी बोलावून चोख बंदोबस्त ठेवला होता. यानिमित्ताने बोरी येथील अमरदीप नेहरू युवा क्रीडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या दोन दिवसीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेला मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व स्थानिक संघांनी हजेरी लावली होती.