Breaking News

मानवी तस्करी विरोधात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मुंबई पोलिस दलाचा सन्मान

मुंबई, दि. 29, जुलै - मानवी तस्करी रोखण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या समाजसेवी संस्था, शासकीय अधिकारी - यंत्रणा तसेच देहविक्रयाच्या व्यवसायातून  बाहेर येत नवे आयुष्य जगणार्‍या देशातील पाच स्त्रियांचा राज्य महिला तस्करीबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गोवा राज्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते  काल सन्मान करण्यात आला.
समाजसेवी संस्थांमध्ये स्नेहालय संस्थेचे डॉ गिरीश कुलकर्णी व प्रज्वला संस्थेच्या डॉ सुनीता कृष्णन यांचा सन्मान झाला. शासकीय यंत्रणेत मुंबई पोलिसांच्या मानवी  तस्करी विरोधी पथकाच्या उल्लेखनीय कार्याबाबत मुंबई पोलिस दलाचा सत्कार करण्यात आला. मुंबई पोलीस आयुक्तांच्या वतीने राजेंद्र दाभाडे, उपायुक्त,  अंमलबजावणी यांनी हा सन्मान स्वीकारला. सोबतच तेलंगणाचे पोलीस अधिकारी महेश भागवत, तामिळनाडूचे आयएएस अधिकारी प्रभुशंकर, राजस्थान पोलिसांच्या  मानवी तस्करी विरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी राजीव शर्मा यांनाही मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रतिकूल परिस्थिती, फसवणूक आदीमुळे  देहविक्रय व्यवसायात गेलेल्या मात्र समाजसेवी संस्थाच्या मदतीने पुन्हा नवे आयुष्य जगणार्‍या देशातील पाच महिलांचाही सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य  महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.