Breaking News

बेकायदा धार्मिक स्थळांवर कोणत्याही क्षणी कारवाई

औरंगाबाद, दि. 29, जुलै - हायकोर्टाच्या आदेशानुसार अवैध व बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत गुरुवारी महापालिकेत बैठकांचे सत्र रंगले.  कारवाईसंदर्भात प्रशासन काहीच माहिती देत नाही असे लक्षात आल्यामुळे महापौर भगवान घडमोडे प्रोटोकॉल तोडून आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या दालनात गेले.  तेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई होणारच, असे आयुक्तांनी सांगितले. हायकोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यावर झालेल्या बैठकीत कारवाईसाठी चार पथके स्थापन  केल्याचे आयुक्तांनी जाहीर केले, मात्र दोन दिवस झाले तरी कारवाईकेली नाही. बुधवारी मुंबईला गेलेले आयुक्त गुरुवारी परतले. धार्मिक स्थळांवरील कारवाईसंदर्भात  प्रशासनाकडून माहिती जाणून घेण्यासाठी महापौरांनी आयुक्तांना आपल्या दालनात या असा निरोप दिला, पण पंधरा -वीस मिनीटे झाली तरी आयुक्त महापौरांच्या  दालनात आले नाहीत. त्यामुळे महापौरच स्वतः आयुक्तांच्या दालनात गेले. तेथे त्यांनी दहा मिनिटांपर्यंत चर्चा केली आणि पुन्हा आपल्या दालनात आले. महापौरांच्या  पाठोपाठ आयुक्त देखील महापौरांच्या दालनात आले. अँटीचेंबरमध्ये आयुक्त, महापौर व काही पदाधिकार्‍यांची सुमारे पाऊण तास बैठक चालली. त्यानंतर आयुक्त  पुन्हा आपल्या दालनात आले. तेथे त्यांनी सर्व विभागप्रमख, वॉर्ड अधिकारी यांची व्यापक बैठक घेतली. धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठीच ही बैठक झाल्याचे  सांगण्यात आले, मात्र बैठकीबद्दल उघडपणे बोलण्यास कोणी तयार नव्हते.