Breaking News

महिलांचा लैंगिक छळ संरक्षण अधिनियमाबाबत 19 रोजी कोल्हापूर येथे एक दिवशीय कार्यशाळा

सातारा, दि. 18 (प्रतिनिधी) : राज्य महिला आयोगातर्फे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संरक्षण अधिनियम 2013 कायद्याच्या अंमलबजावणी व जागृती  निर्माण होण्यासाठी सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय स्तरावरील कार्यालयातील समितीचे अध्यक्ष, एक  सदस्य व कार्यालय प्रमुख  यांच्यासाठी लोक विकास केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे दि. 19 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 9.30 वा. एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली आहे,  अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिलीप हिवराळे यांनी दिली आहे.
अंतर्गत तक्रार समितीचे कामकाज चालविण्यासाठीचे कामकाज पध्दतीचे ज्ञान, समितीने नि:पक्षपातीपणे काम कसे करावे, तक्रारीचे जलद निवारण कसे करावे  याबाबतची अंमलबजावणी कशी करावी तसेच समितीस तज्ञांमार्फत मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ.  विजया रहाटकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, सदस्या विंदा किर्तीकर, आशा लांडगे, सदस्य सचिव मंजूषा मोळवणे, प्रकल्प अधिकारी मानकर उपस्थित  राहणार आहेत.
महिलांना त्यांच्या तक्रारी स्थानिक स्तरावर मांडण्याकरीता महिला आयोग तुमच्या दारी या उपक्रमाद्वारे 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता बाल कल्याण संकुल,  मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे राज्य महिला आयोग यांची जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. जनसुनावणीमध्ये तक्रारदार पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ  मदत व्हावी त्या अनुषंगाने कोणतीही पिडीत महिला कोणतीही पूर्व सूचना न देत थेट सुनावणीस उपस्थित राहून लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. या  जनसुनावणीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, सदस्या व विधी सेवा प्राधिकरणाचे विधी तज्ञ, वरिष्ठ पोलीस अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक इ. उपस्थित  राहून प्राप्त होणार्‍या तक्रारींचा निपटारा करणार आहेत. या जनसुनावणीचा जास्तीत-जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती जिल्हा महिला व बालविकास  अधिकारी  हिवराळे यांनी केले आहे.