Breaking News

मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये 34 शेतकरी आत्महत्या

औरंगाबाद, दि. 16, ऑगस्ट - मराठवाडा पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी शहारला आहे. मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांमध्ये तब्बल 34 शेतकर्‍यांनी  आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने शेतकरी आत्महत्यांबद्दल माहिती दिली आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत मिळून  प्रत्येक दिवशी सरासरी चार शेतकर्‍यांनी आपलं आयुष्य संपवलं. प्रत्येक शेतकरी आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट आहे.
जानेवारी 2017 पासून आतापर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट 2017 पर्यंत मराठवाड्यातील एकूण 580 शेतकर्‍यांनी जीव दिला आहे. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी  आत्महत्या घडल्याचं समोर आलं आहे. एकट्या बीडमध्येच 107 जीवनयात्रा संपवली. आतापर्यंत 31 लाख शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे. पावसाअभावी  मराठवाडा आणि विदर्भातल्या पिकांची स्थिती बिकट झाली आहे. दुबार पेरणीनंतरही अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांना शेतावर नांगर फिरवावा लागला. जुलैमध्ये 355  पैकी तब्बल 223 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्केही पाऊस झालेला नाही. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यासह जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद अशा भागात  पावसाची सर्वाधिक गरज आहे. येत्या आठवड्याभरात पाऊस न झाल्यास मराठवाड्यासह इतर अनेक भागातल्या शेतकर्‍यांवर नांगर फिरवण्याचीच वेळ येणार आहे.