Breaking News

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे 360 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत 360 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्‍चित केले  आहे. भाजपने 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांसाठीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शाह यांनी आज प्रमुख मंत्री व पदाधिका-यांची  बैठक पक्ष मुख्यालयात बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय मंत्र्यांबरोबरच भाजपचे महासचिव, संघटन महामंत्री, सह संघटन महामंत्री, भाजपशासित राज्यांतील वरिष्ठ  नेते उपस्थित होते.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 150 जागांवर भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न  सुरु केले पाहिजेत . या मतदारसंघांची निवड करून पुढील दोन वर्षांत येथे चांगले काम करण्याचे निर्देश शाह यांनी मंत्र्यांना दिले. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, केरळ,  तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीच्या योजनेचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली.