Breaking News

भुसावळ पोलिसांनी गुरांचा ट्रक पकडला; नाकाबंदी दरम्यान कारवाई

जळगाव, दि. 18, ऑगस्ट - भुसावळ येथील सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेवरून शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे 4 या पाच तासात  पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहीमेत तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्यानंतर झालेल्या कारवाईत तलवार घेऊन फिरणार्‍या हद्दपारीसह  अन्य तीन जणांना अटक करण्यात आले. तसेच नाकाबंदीदरम्यान गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रकदेखील पोलिसांनी पकडला.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत मोरे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले. तसेच नाहाटा चौफुली,  अष्टभुजा देवी आणि महात्मा गांधी पुतळ्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. या मोहीमेदरम्यान दीनदयाल नगरात पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास दीपक राजू पवार  (वय 22, रा. इंद्रनगर, भुसावळ) हा पोलिसांना पाहून लपला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली. त्याच्याकडे पेंचीस एक स्क्रूड्रायव्हर असे  साहित्य सापडले. चोरीच्या उद्देशाने तो पहाटे फिरत होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला. कारवाईच्या मोहीमेमुळे उपद्रवींचे धाबे  दणाणले आहे.
नाकाबंदीच्या काळात नाहाटा चौफुलीजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना आयशरद्वारे (क्र.एम.पी.12.जी.ए.0733) गाडीत गुरे कोंबल्याचे आढळले. ट्रकमध्ये 14  म्हशी 10 पारडू अशी 24 गुरे दाटून कोंबली होती. पोलिसांनी तत्काळ सर्व गुरांना जळगाव येथील पांझरपोळमध्ये रवाना केले. एका म्हशीचा मृत्यू झाला. वाहनचालक  वसीम खान सलीम खान (रा. खंडवा) अबूजर उस्मान गती (वय 35 रा. हिरापूर, मालेगाव) यांना अटक झाली. तसेच आयशर जप्त केली.