Breaking News

महाराष्ट्राचे ’प्रशांत किशोर’ अर्थात आशिष कुलकर्णींचा काँग्रेसला रामराम

मुंबई, दि. 19, ऑगस्ट - महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रशांत किशोर म्हणून ओळख असलेल्या आशिष कुलकर्णी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी  आपल्या पदाचा राजीनामा राहुल गांधींकडे पाठवला आहे. ते काँग्रेसचे समन्वय समितीचे सदस्य होते. तसेच त्यांना राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखलं जातं.  आशिष कुलकर्णींची महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विविध राजकीय पक्षांच्या निवडणुकीची रणनिती ठरवण्यात त्यांनी महत्त्वाची  जबाबदारी पार पाडली आहे. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रशांत किशोर अशी उपमा दिली जाते.
कुलकर्णी यांनी शिवसेनेपासून राज्याच्या राजकारणात पडद्यामागे राहून काम करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेत, मग राणेंनी काँग्रेसमध्ये  प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षात सहभागी झाले. आता राणेंचीही पक्षात घुसमट होतेय आणि ते देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु  आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कुलकर्णींनी राहुल गांधींकडे राजीनामा सोपवत काँग्रेसला रामराम ठोकलाय.
दरम्यान, कुलकर्णींना राणे शिक्का मान्य नाही. राहुल गांधी जिथं काँग्रेससाठी सल्लागारांची टीम नव्यानं बनवण्याच्या तयारीत असताना कुलकर्णींचा राजीनाम्याचा राहुल  गांधी आणि काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.