0
मुंबई, दि. 18, ऑगस्ट - शिवसेना पक्षात कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत, कुठलाच अंतर्गत वाद नाही, असं म्हणत शिवसेनेतील धुसफूशीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पूर्णविराम दिला आहे. तसंच भाजपच्या मिशन 2019 च्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना काही हेवेदावे असतील तर ते विसरुन रस्त्यावर उतरुन कामाला लागा असे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. नुकतीच शिवसेना राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मंत्री विरुद्ध जिल्हा प्रमुखांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज मौन सोडत पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचा दावा केला आहे. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. आणि लाभार्थी शेतकर्‍यांची आकडेवारी विधानसभेत जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली. भाजप कालच जाहीर केलेल्या मिशन 350 वरही उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेत कुठलेच मतभेद नाही, कुठलाच अंतर्गत वाद नाही, तुम्ही जे रंगवलं त्याच्यावर कालच पडदा पडला, असं सांगत हाजी अराफत शेख यांच्या स्फोटक आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप आपला नंबर 1 चा शत्रू आहे. त्यांनी 2019 साठी तयारी सुरु केली आहे. आता आपल्यालाही रस्त्यावर उतरून तयारी करावी लागेल. त्यामुळे आता आपापसातील हेवेदावे बंद करा आणि कामाला लागा, असा आदेशच उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे.

Post a Comment

 
Top