Breaking News

जोगेच्या खोट्या नोंदी करणार्‍यांवर कारवाईसाठी आमरण उपोषण

बुलडाणा, दि. 18 - मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथील समाधान जानकीराम पद्मने यांच्या जागेची तात्कालीन सचिव आर.जी.पवार यांनी बनावट ठराव घेवून  परस्पर दुसर्‍यांची नोंद केल्याने पदमने कुटुंब बेघर झाले आहे. सबंधित सर्व दोषींवर कार्यवाही व्हावी, यासाठी समाधान पदमने हे पत्नी व अडीच वर्षांच्या मुलीसह 15  ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे. 
पदमने यांच्या उपोषणाला चौथा दिवस उजडला तरीही निर्ढावलेल्या प्रशसनाने उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. दरम्यान उज्वला समाधान पदमने या  उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांना अडीच वर्षांची मुलगी असल्याने मुलीला दूध पाजणे कठीण झाले आहे. उज्वलाबाईची तब्येत खराब झाल्याने जिल्हा सामान्य  रुग्णालयात एक दिवस उपचारार्थ भरती केले होते.
सदर उपोषणकर्त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, माझी जागा क्र. 398,394 अ, 1396 व आता 1458 अशी बेकायदेशीर परस्पर फेरफार घेवून माझे  दुकान व घराचा रस्ता दुसर्‍या व्यक्तीच्या नावे नोंद केली व उर्वरित जोगेचा घरात येण्या-जाण्याचा मार्गच बंद केला आहे. तत्कालीन सचिव आर.जी.पवार  यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या 2014 पासून अनेकांच्या तक्रारी आहेत. सदर जागा माझ्या नावावर असून मालकी हक्क 45/15 नुसार क्षेत्रफळ 43 बाय 10 अशी नोंद  आहे. परंतु जागा वडिलांच्या मालकी हक्क 33 बाय 25 आहे. त्यासमोर संतोष पायघन यांनी 23 बाय 25 जागा विकल्याचे करारनामा करुन दिला आहे. तरी सर्व  जागा मोजून रस्ता दाखवून द्यावा. सदर जागा संतोष पायघन यांनी अडीच लाखाला विकली. सदर व्यवहार शंभरच्या बाँडपेपरवर नोटरीची मुदत 6 महिन्यांची केली  आहे.
सदर जागा शासनाची अतिक्रमीत असताना पायघन यांना विकण्याचा अधिकार आहे काय असा उलटप्रश्‍न निर्माण केला असून ग्राम सचिवाने वरीष्ठ अधिकार्‍यांना,  लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन संगनमताने खोट्या नोंदी करुन घोटाळा केला आहे. असा आरोप पदमने यांनी केला असून ते सर्व संबंधितांना वेळोवेळी याबाबत  तक्रारी करत आले आहेत. त्याची दखल न घेतल्याने ते 15 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांची वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज आहे.