Breaking News

आम्हाला कुणाकडून प्रमाणपत्र नको; राहुल गांधींना संघाचे प्रत्युत्तर

नागपूर, दि. 18, ऑगस्ट - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद यादवांच्या सभेत केलेल्या आरोपांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी नागपुरात आयोजित ग्रंथालय भारतीच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी वैद्य म्हणाले की, संघाचे अनेक  स्वयंसेवक प्रत्यक्षपणे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. काहींना फाशीदेखील झाली आहे. आरोप करणार्‍यांना मुळात संघच माहीत नाही. त्यांचा जनाधार कमी  होतो आहे आणि आपले अपयश लपविण्यासाठी ते त्यांच्या आजी व पणजोबांची कामगिरी सांगत आहेत, या शब्दांत संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.  मनमोहन वैद्य यांनी त्यांच्यावर टीका केली. 
संघ समाजाला संघटित करण्याचे काम करतो. संघ प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला नाही, मात्र संघाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरले होते.  अगदी महात्मा गांधींच्या जंगल सत्याग्रहात आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देखील 1930 साली सहभागी झाले होते. मात्र असे करीत असताना  त्यांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी डॉ. परांजपे यांच्याकडे दिली होती. अनेक स्वयंसेवकांना फाशीदेखील झाली होती. मात्र राहुल गांधी हे त्यांना माहीत असलेला  इतिहास सांगत आहेत. त्यांना संघदेखील माहीत नाही. तो जे इतिहास जाणतात त्याचा ॠप्रोपोगंडा’ करीत आहेत. संघाला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.  संघ आपले काम करीत राहील. प्रत्यक्षात ही चर्चाच योग्य नाही, असे वैद्य यांनी स्पष्ट केले.
2014 पूर्वी देशात पुरोगामित्वाच्या नावाखाली खरा भारत व त्याची संस्कृतीच नाकारण्यात आली. आपण जे आहोत, ते आम्ही नाहीत हे सांगण्याची स्पर्धा होत होती.  यात काही विदेशी संस्था व देशातीलच विचारधारा सहभागी होत्या. मात्र भारताला नाकारणार्‍याचा जनाधार आता संपत आहे. विरोधात प्रचार होत असतानादेखील  संघाची स्वीकारार्हता वाढते आहे, संघाच्या संकेतस्थळावर 2015 साली 31 हजार 800 तरूणांनी संलग्नतेसाठी विनंती केली होती. तर 2016 मध्ये 47 हजार 200  आणि 2017 मध्ये जुलै महिन्यापर्यंत 71 हजार 800 तरुणांची रिक्वेस्ट प्राप्त झाली आहे. यावरून संघाची वाढती लोकप्रियता अधोरेखित होत असल्याचे डॉ.  मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले.