Breaking News

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त निलेशचा भाऊ सापडला; निलेशला शोधण्याची मोहीम सुरूच

जळगाव, दि. 19, ऑगस्ट - जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्ल व त्याचा लहान भाऊ गणपत हे दोघे  दि 15 मे पासून बेपत्ता झाले होते. त्यांच्या अपहरणाची तक्रारही त्यांच्या आईने पोलिसांत दिली आहे. मात्र त्यांचा काहीही ठावठीकाणा लागत नव्हता. 
तब्बल तीन महिन्यांचा काळ लोटल्यानंतर निलेशचा लहान भाऊ गणपत हा कानपूर (उत्तर प्रदेश) येथे आढळून आला. माहिती मिळाल्यावरुन त्याला स्वगृही  आणण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांचे पथक कानपुर (उत्तर प्रदेश) येथे दि 16 ऑगस्ट रोजी रवाना झाले होते. त्यानुसार 17 ऑगस्ट रोजी दु 2:30 वाजता हे पथक  कानपुरात पोहचले व तेथील स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यातुन घेण्यासाठी शासकीय सोपस्कार पार पाडत बालकाला ताब्यात घेतले. परंतु निलेश भिल्ल अद्यापही बेपत्ता  आहे. तेथील स्थानिक पोलिस व गावकर्‍यांना सोबत घेत निलेश चे शोधकार्य सुरु केले आहे.
या कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी तत्कालीन तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक वंदना सोनुने, पो कॉ कांतीलाल केदारे व विनोद  पाटील यांचे पथक तयार करीत सोबत निलेशची आई सुंदरबाई भिल्ल यांना घेवून कानपूर येथे बुधवारी सायंकाळी रवाना केले.
गणपत हा गेल्या पंधरा दिवसापुर्वी दि 24 जुलैला कानपुरातील सेंट्रल लोहमार्ग पोलिसांना भेदरलेल्या स्थितीत आढळला होता. पोलिसांनी त्याला तेथील चाईल्ड  लाईन या स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिला. या संस्थेचे निर्देशक कमलकांत तिवारी यांनी या बालकास कानपुरातील किजवई नगरातील सुभाष चिल्ड्रन्स होममध्ये  दाखल केले होते. त्यामुळे मुक्ताईनगरहुन गेलेले पोलिस पथक कानपुरातील स्थानिक पोलिसांना घेत थेट याठिकाणी पोहचले व बालक गणपतच आहे याची खात्री  केली. आता राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त निलेशला शोधण्यासाठीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याचेही पोलिसांनी सागितले. निलेश राष्ट्रीय बाल शौर्य  पुरस्काराचा मानकरी असल्याने पंतप्रधान कार्यालयातूनही तपास कार्याबद्दल वेळोवेळी मागोवा घेतला जात आहे.