0
शिर्डी, दि. 18, ऑगस्ट - शेतकर्‍यांना आत्महत्या करायला भाग पाडणारी धोरणे राबविणारेच देशद्रोही आहेत. शिवाय, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्याऐवजी  ब्रिटिशांची भलावण करणार्‍या संघटनांना गुरुस्थानी मानणार्‍यांनी शेतकर्‍यांना देशभक्ती शिकवू नये., असा पलटवार डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. डॉ.  नवले हे शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे समन्वयक आहेत. मुख्यमंत्र्यांचा आजचा त्रागा अनाठायी आहे. त्रागा केल्याने प्रश्‍न सुटणार नाहीत. त्यासाठी धोरणे  बदलावी लागतील, असेही डॉ. अजित नवले म्हणाले.
शेतकर्‍यांची कर्जमाफीची मागणी अराजक पसरवणारी असेल, तर विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री अशी मागणी करुन अराजकच पसरवत होते काय?, असा सवाल  डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकर्‍यांची कर्जमाफीची मागणी म्हणजे देशद्रोह व अराजक आणि कॉर्पोरेट कंपन्यांची करमाफी, कर्जमाफी म्हणजे देशप्रेम व सुशासन  हा कुठला न्याय?, असा संतप्त सवालही डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला.
खर्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ व्हावा म्हणून अटी-शर्ती असतील व त्यामुळे नियमित कर्ज भरणारे, सावकारांकडून, पतसंस्थांकडून कर्ज घेणारे, सिंचन,  पॉलीहाउस व शेडनेट साठी कर्ज घेणारे वंचित राहणार असल्याने खरे शेतकरी ठरणार नसतील तर मग खरे शेतकरी नागपूरच्या रेशीम बागेत शोधायचे का?, असेही  डॉ. नवले यांनी विचारले.

Post a Comment

 
Top