Breaking News

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमधील सर्व पदे भरणार - डॉ. दिपक सावंत

नाशिक, दि. 18, ऑगस्ट - राज्याची सार्वजनिक आरोग्य विभागातील सात हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत असून 22 ऑगस्टनंतर या पदावरील शंभर  टक्के नियुक्त्यांमुळे आरोग्य विभागाला नवसंजिवनी मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी केले. 
सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयातील आधुनिक ट्रामा केअर सेंटरचे उद्घाटन डॉ.सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार दिपीका चव्हाण,  जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती यतिंद्र पाटील, नगराध्यक्ष सनिल मोरे, आरोग्य उपसंचालक लोचना घोडके, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून या विभागातील वर्ग 3 व 4 शंभर टक्के पदे भरण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मान्यता दिली आहे. वैद्यकिय अधिकार्‍यांची पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले आहेत. याचबरोबर 781 बीएएमएस वैद्यकिय अधिकार्‍यांना  सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आरोग्य सेवेचे काम आशावर्कर, एमपीडब्लू, एएनएम नर्सेस रात्रंदिवस करत असतात. वैद्यकिय अधिकार्‍यांपासून आरोग्य कर्मचारी असे सर्वांनाच रुग्णांना  चांगली सेवा देण्याची इच्छा असते. यामुळे मागच्या कालावधीत राज्यभरात शासकिय रुग्णालयातून 15 हजार नेत्ररुग्णांवर डोळ्यांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात  आल्या आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी देखील शासकिय रुग्णालये आपली आहेत असे मानून ही स्वच्छ व सुंदर राखावी. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य चांगले  होण्यास मदत मिळेल हे तुमचे सामाजिक योगदान आहे.
आरोग्य सेवेमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस व कर्मचार्‍यांनी रुग्णांशी उत्तम सुसंवाद राखून जिव्हाळ्याची वागणून द्यावी. यासाठी येणारा रुग्ण हा आपला कुटुंबिय  आहे असे समजून उपचार करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सटाणा येथील ट्रामा सेंटर साठी डिजीटल व पोर्टेबल एक्स रे मशीन, रिक्त पदांवर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यास मान्यता देतानाच अपघातातील रुग्णांवर विशेष  उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्ती करण्यासाठी तरतूद करण्यात येईल असे, डॉ.सावंत यांनी सांगितले.
यावेळी आमदार श्रीमती चव्हाण, आरोग्य सभापती पाटील, नगराध्यक्ष मोरे यासह विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी आरोग्य सेवेमध्ये उत्कृष्ट  योगदान देणार्‍या वैद्यकिय अधिकार्‍यांचा सत्कार आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. जगदाळे यांनी आभार मानले.