Breaking News

वाचनाची आवड निर्माण करण्याचे ‘अक्षरभारती’चे ध्येय

संस्थापक भानुदास आभाळे; सर्वोदय छात्र निवासातील विद्यार्थ्यांना पुस्तके भेट

अकोले, दि. 18 - समाजाच्या तळागाळापर्यंत वाचनाची आवड निर्माण करण्याचे अक्षरभारतीचे ध्येय आहे. ज्यांना गरज आहे, त्यांना वाचनासाठी पुस्तके देण्याचे  काम संस्था करीत असून मागील दहा वर्षात 1 हजार ग्रंथालये अक्षरभारतीने सुरु करुन दिली असल्याची माहिती अक्षरभारतीचे संस्थापक भानुदास आभाळे यांनी  दिली. 
येथील सर्वोदय छात्रनिवासातील विद्यार्थ्यांना अक्षरभारतीतर्फे पाचशे पेक्षा अधिक पुस्तके ग्रंथालय सुरु करण्यासाठी भेट देण्यात आली. वसतिगृहातील अधिक्षक शरद  हासे व विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा स्वीकार केला. यावेळी श्री.आभाळे बोलत होते. मूळचे अकोले तालुक्यातील इंदोरीचे रहिवाशी असणारे श्री. आभाळे हे पुणे येथे  सध्या सिमेंटीका या सॉफ्टवेअर कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत आहेत. दहा वर्षापूर्वी त्यांनी तीन सहकार्‍यांच्या मदतीने अक्षरभारतीची स्थापना केली. विद्यार्थ्यांना  देण्यात येणारी पुस्तके ही तज्ज्ञांकडून संशोधन करुन निवडली जातात. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण करायला ही पुस्तके उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.  समाजातील ज्या घटकाला गरज आहे, तेथेच पुस्तके दिली जातात. जगाबरोबर आपल्याला रहायचे असेल तर ज्ञान आणि तंत्रज्ञान या दोनच गोष्टींची आज देशाला  गरज आहे, जोपर्यंत संपूर्ण समाज साक्षर होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती झाली असे आपण म्हणू शकत नाही असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी विविध  विषयांवर गप्पा मारल्या.
सत्यनिकेतन संस्थेचे सदस्य विलास नवले, प्रकाश टाकळकर यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली. भाऊसाहेब कासार यांनी श्री.आभाळे यांचा परिचय करुन देतानाच  अक्षरभारतीच्या कार्याची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना वर्षभरात अक्षरभारती मार्फत पुस्तकांबरोबरच शालेयोपयोगी साहित्य व संगणक देण्यात  आल्याचे सांगितले. गणपत सहाणे, बाळासाहेब शेळके, अनिल पवार, संजय भोर, नितीन नेहे, किशोर हासे आदी  उपस्थित होते.