Breaking News

कराड तालुक्यात बनावट दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

कराड, दि. 18 (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात विक्रीस येणारी पावणेतीन लाखाची बनावट दारू उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने कराड  तालुक्यात येणपे येथे जप्त करण्यात आली. याप्रकरणी प्रदीप पांडुरंग साळुंखे (वय 26, रा. पाडळी, ता. शिराळा) व दारू विक्रेता सचिन अण्णा वाघ (रा. वाकुर्डे, ता.  शिराळा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. 
सांगली जिल्ह्यातून उंडाळे येथे ती दारू विक्रीस येणार होती. त्यावेळी उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने येणपे येथील खिंडीत सापळा रचून त्यास पकडले. त्यावेळी  सुमो सापडली. त्यात विदेशी दारूचे 15 बॉक्स सापडले. त्यात 5 बॉक्स दारू बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले. सचिन वाघ याच्या वाकुर्डे येथील घरावर छापा  टाकला. तेथेही 6 बॉक्स जप्त झाले. विभागीय आयुक्त संगीता दरेकर, अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरिक्षक पी. सी. शेलार, सतीश कोळभोर,  उत्तम सावंत, जीवन शिर्के, सचिन खाडे, नितीन जाधव, विनोद बनसोडे व महेश मोहिते यांनी कारवाई केली. कारवाईत बनावट दारूसह 2 लाख 75 हजार 216  रूपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.