Breaking News

’झाडयुक्त शिवार’ संकल्पना उत्स्फूर्तपणे राबवावी- संजय माळी

सोलापूर, दि. 18, ऑगस्ट - राज्यात गेल्या दोन वर्षांपासून ’जलयुक्त शिवार’ संकल्पनेस उदंड प्रतिसाद मिळाला अन् त्याचा चांगला परिणाम दिसला. त्याचबरोबर  आता प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीसाठी ’झाडयुक्त शिवार’ संकल्पना उत्स्फूर्तपणे राबवावी, असे आवाहन उपवनसंरक्षक संजय माळी यांनी केले. किर्लोस्कर  वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वसुंधरा मित्र पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 
याप्रसंगी दिग्दर्शक नीरजा पटवर्धन, संदीप सावंत यांच्याशी संवाद कार्यक्रम आयोजिला होता. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजिलेल्या कार्यक्रमात  उपवनसंरक्षक माळी बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यातील लोक कष्टाळू आहेत. पाण्याचे योग्य नियोजन करून, आधुनिक तंत्रज्ञान पर्यावरणपूरक शेतीचे मार्गदर्शन  त्यांना करण्याची गरज आहे. नान्नजच्या माळढोक पक्षी अभयारण्यात 20 वर्षांपूर्वी 100 पेक्षा जास्त माळढोकांची संख्या होती. पण, सध्या फक्त एकच माळढोक त्या  ठिकाणी आहे. बदलत्या शेती अन् तंत्रज्ञानाचा फटका वन्यजीवांना बसत असल्याचे चित्र आहे. शहर ग्रामीण भागातील प्रत्येक वसाहतीमध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था  करण्यात येते. पण, त्याच परिसरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होत  असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी श्री. भतगुणकी यांना वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकार समीर इनामदार यांना सोलापूर विद्यापीठात  ज्येष्ठ कलावंत नाना पाटेकर यांच्या हस्ते ’वसुंधरा मित्र’ पुरस्कार देण्यात आला होता. डॉ. फडकुले सभागृहातील पुरस्कार वितरण कार्यक्रमास बाबूराव पेठकर, संदीप  सावंत आदी उपस्थित होते.