Breaking News

कोकणाबाहेरील विद्यार्थ्यांची कोकण कृषी विद्यापीठाला पसंती

रत्नागिरी, दि. 18, ऑगस्ट - दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील पहिल्या पसंतीच्या कृषी महाविद्यालयात खुल्या वर्गातील प्रवेशासाठी  यावर्षी 90 टक्क्यांपासून सुरवात झाली असून गेल्या वर्षीपेक्षा यंदाची गुणवत्ता यादी तीन टक्क्यांनी घटली आहे. मात्र कोकणाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी असणार्यां प्रवेश  कोट्याची सुरवात 111 टक्क्यांच्या घरात पोहोचल्याने कोकणाबाहेरील विद्यार्थ्यांनी दापोलीच्या विद्यापीठाला अधिक पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशातील आदर्श कृषी विद्यापीठ म्हणून दापोलीचे कोकण कृषी विद्यापीठ ओळखले जाते. त्यामुळे या विद्यापीठातील महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.  यंदा राज्यातील चार कृषी विद्यापीठांत एकूण 15 हजार 267 जागा असून त्यासाठी 57 हजार 400 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामध्ये बाळासाहेब सावंत कोकण  कृषी विद्यापीठाच्या फक्त एक हजार 250 जागांचा समावेश आहे. सर्व कृषी विद्यापीठांत सत्तर टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असतात, तर 30 टक्के  जागा उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. दापोलीतील कृषी विद्यापीठाला शिक्षणाबाबत राज्यातील विद्यार्थ्यांकडून अधिक पसंती मिळत असल्याने  अनेक विद्यार्थ्यांचा कल कोकण कृषी विद्यापीठाकडे असतो. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मात्र राहुरीच्या कृषी विद्यापीठाला अधिक पसंती दिली जाते, असे मत कृषी  विद्यापीठ वर्तुळात व्यक्त होत आहे.
कृषी अभ्यासक्रमाच्या उर्वरित प्रवेश याद्या काल जाहीर झाल्या. तिसरी यादी 22 ऑगस्टला जाहीर होणार आहे. त्यानंतरच हा प्रवेश किती गुणांपर्यंत बंद होईल, हे  निश्‍चि त होणार आहे. कृषी अभ्यासक्रमासाठी क्रॉप सायन्सचे 12 टक्के, स्थानिक शेतकर्याचिा मुलगा म्हणून 12 टक्के आणि विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी तीन टक्के  असे वाढीव गुण किंवा कमाल 20 टक्के गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्याचे 90 टक्के गुण म्हणजे मुळात 70 टक्के आणि कोकणाबाहेरील विद्यार्थ्याचे  111 टक्के गुण म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेत 91 टक्के गुण असतात. साहजिकच यातून उर्वरित राज्यातील किती हुशार विद्यार्थी कृषी शिक्षणासाठी इच्छुक आहेत, हे स्पष्ट  होते.
दरम्यान, कृषी शिक्षणातील जाचक अटी रद्द करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी व्यक्त केले. कृषीविषयक  महाविद्यालयांचे ते संचालकही आहेत. ते म्हणाले की, कृषीप्रधान भारतात अन्नधान्याची मुबलकता आणि सुबत्ता येण्यासाठी कृषी विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली.  राज्यात चार कृषी विद्यापीठांमधून दरवर्षी सोळा हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी कृषी महाविद्यालयामध्ये सहज प्रवेश घेत असत.  मात्र यंदापासून टक्केवारीची अट घातली गेल्याने कोकणासह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्येच फटका बसला आहे. खुला प्रवर्गासाठी पन्नास टक्के आणि  इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-जमातींसाठी चाळीस टक्के गुण आवश्यक असल्याची ही अट जाचक आणि अन्यायकारक आहे. 50 पेक्षा कमी टक्केवारीच्या  विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. याबाबत राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुडकर यांना भेटणार असल्याचे श्री. निकम  यांनी सांगितले.