Breaking News

लालठाणे गावाने घेतला दारूबंदीचा निर्णय

पालघर, दि. 18, ऑगस्ट - पालघर जिल्ह्यातील गावापाड्यात स्वच्छता ची मोठ्या प्रमाणात जनजागृती होवून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे. आता  गावागावात दारूबंदीबाबत शासनस्तरावर विविध उपक्रम सुरु असतानाच पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेला नऊ किलोमीटर अंतरावर वसलेल्या लालठाणे गावात  मंगळवारी झालेल्या ग्राम सभेत गावाने दारू बंदीचा निर्णय घेतला आहे. 
लालठाणे गाव तसे निसर्गाच्या कुशीत वसलेले असून गावाची लोकसंख्या सुमारे हजाराच्या घरात आहे. गावात प्रामुख्याने कुणबी आणि आदीवासी जातीचे लोक  वास्तव्य करतात. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.मात्र पावसाच्या अनियमितपणा मुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला  आहे. अशा अवघड परिस्थितीमध्ये काही तरूण व्यसनात अडकू नये तसेच गाव निर्व्यसनी राहावं या उदात्त विचाराने 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्राम सभेत दारू बंदी  घालण्याची मागणी सर्वच स्तरातून झाली. विशेषतः महिला वर्गाने यासाठी जास्त पुढाकार घेतला. शेवटी सर्वांच्या मते गावामध्ये येत्या21 ऑगस्ट पासून दारू बंदी  घालण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला.
स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून दारू बंदीसाठी गावात मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये दारू बंदी बाबत जनजागृती करण्यात आली.  या वेळी दारू बंदी साठी घोषणा देण्यात आल्या. गावचे पोलिस पाटील संदेश पाटील, सरपंच संजना लाबाड, उपसरपंच राकेश पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  माधव पाटील, जतिन पाटील यांच्या सह ग्रामस्थ सहभागी झाले होते. तदनंतर झालेल्या ग्राम सभेत गावाने दारू बंदी करण्याच्या निर्णयाला तरूण व महिला वर्गाने  जास्त पुढाकार घेतला. लालठाणे या गावाने घेतलेल्या निर्णयाचे पालघर तालुक्यात विविध स्तरावर अभिनंदन होत असून इतरही काही गावे असा निर्णय घेण्याच्या  तयारीत असल्याचे समजते. दरम्यान, लालठाणे गावा बरोबरच लोवरे ग्राम पंचायतीने सुद्धा दारू बंदी चा निर्णय घेतला आहे.