0
जालना, दि. 19, ऑगस्ट - लग्नाळू प्रौढ युवकांकडून पैसे उकळून त्यांचे लग्न लावायचे आणि नंतर नवरीने पलायन करायचे असे फसवणूकीचे कारस्थान करणारी  टोळी जालना जिल्हयात पोलिसांनी पकडली असून त्यात नवरिचे नाटक करणारी मुलगी व तिचा खरा नवरा हे दोघे बुलढाणा जिल्हयातले आहेत. या बाबत सविस्तर  हकिकत अशी की औरंगाबादेतील सातारा परिसरातील गणेश सदाशिव कुलकर्णी या 28 वर्षाच्या युवकाने बदनापूर तालुक्यातील कांडारी येथील संत भावानदास बाबा  वधू वर सूचक केंद्र चालक काकाजी यमाजी खाडे ( रा. कंडारी बु. ता. बदनापूर) यांच्याशी लग्नासाठी संपर्क साधला असता त्यांनी पुजा चव्हाण या युवतीशी ओळख  करून दिली तिच्या सोबत असलेला तरूण तिचा भाऊ असून त्याचे नाव गणेश चव्हाण असल्याचे सांगितले. कुलकर्णींनी पुजासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली  तेंव्हा त्या बदल्यात खाडे यांनी त्यांच्याकडून दीड लाख रूपये घेतले.
त्यानंतर गाजावाजा न करता सहा ऑगस्ट रोजी त्यांचे लग्न झाले लग्नानंतर आठ दिवसांच्या आत पुजा पळून गेली. कुलकर्णी यांनी तिच्या शोधात कांडारी गाठले  असता तिच्या उडवाउडवीच्या उत्तरावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बदनापूर पोलिसांत धाव घेतली हवालदार जॉन कसबे यांनी तपास  केला असता पुजा चव्हाण आणि गणेश चव्हाण हे भाऊ बहिण नसून पतीपत्नी आहेत.ते मुळचे बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील मांडवा येथील असून त्यांचे  नाव ज्योती व बद्री असे आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून पोलिस कोठडीत घातले असून पुजा कडून मणीमंगळसूत्र जप्त केले आहेत. पुजा उर्फ ज्योतीचे  आई-वडील किनगावराजा येथील एका शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. बद्र्रीने त्याच्या गावी एक प्लॉट घेतलेला असून त्याने या प्लॉटचे 70 हजार रूपये एका  नातेवाईकाला दिल्याचे तपासात पुढे आले आहे.या जोडप्याने आणखी किती लग्नाळू युवकांना गंडवले आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

Post a Comment

 
Top