Breaking News

शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते वसंतराव आपटे यांचे निधन

सोलापूर, दि. 18, ऑगस्ट - शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते वसंतराव आपटे यांचे आज गुरुवारी वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांची अंतयात्रा राहत्या घरापासून  सांयकाळी 5:30 वाजता निघणार आहे.
स्वर्गीय वसंतराव आपटे कॉलेज जीवनापासून भाई एस.एम.पाटील यांच्या जनता दल चळवळीशी जोडले गेले. 1981 साली शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत  वाहून घेऊन कामाला सुरुवात केली. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातही त्यांनी काम केले.अनवाणी शेतकरी श्रीमंत व्हावा यासाठी ते  आयुष्यभर झटले.सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना तसेच सोलापूर जिल्हा दूध संघातही ते संचालक होते.
आयुष्यभर चळवळीत काम करत असतानाही त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही.श्रीमंत असूनही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा त्यांचा स्वभाव  होता. आपल्या श्रीमंतीचा वापर त्यांनी शेतकरी आंदोलनासाठी केला. जुने व्यक्तिमत्व असतानाही त्यांनी अंधश्रद्धाला कधीही थारा दिला नाही. ते कर्मकांडाला मानत  नव्हते म्हणून त्यांनी आपल्या तीनही मुलांची मुंज केली नव्हती. आपटे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी या गावात सुरू केलेली दूध डेअरी आजही  तितक्याच जोमाने चालते आहे. कारण त्यांनी या डेअरीचा वापर कायम शेतकर्‍यांच्या हितासाठीच केला होता.