Breaking News

गणेशोत्सवासाठी बुधवारी चिपळूण-सावंतवाडी खास एसटी बस

रत्नागिरी, दि. 19, ऑगस्ट - गणेशोत्सवासाठी चिपळूणातून सिंधुदुर्गात जाणा-या प्रवाशांसाठी येत्या बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) विशेष एस.टी. सोडण्यात येणार  आहे. चिपळूणच्या सिंधुदुर्ग मित्र मंडळाचे अध्यक्ष धुंडीराज सावंत यांनी ही माहिती दिली. 
चिपळूण परिसरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थ राहतात. या सर्वांनी एकत्र येऊन सिंधुदुर्ग मित्रमंडळाची स्थापना 1996 साली केली आहे. सिंधुदुर्ग मित्रमंडळाचे  चिपळूण शहरात 225 सदस्य आहेत. त्याव्यतिरिक्त सभासद न झालेल्या कुटुंबांची संख्याही सुमारे 125 आहे. सिंधुदुर्गातील नोकरदार, व्यावसायिकांच्या समस्या  सोडविण्यासाठी मित्रमंडळ कार्यरत असते. गणेशोत्सवात अनेकांना गावी जाण्याचे नियोजन आयत्या वेळी करावे लागते. अशा ग्रामस्थांना हक्काची एस.टी. असावी  यासाठी दरवर्षी सिंधुदुर्ग मित्रमंडळातर्फे प्रयत्न केले जातात. यावर्षीदेखील मित्रमंडळाने चिपळूण आगार व्यवस्थापकांना जादा गाडी सोडण्याबाबत पत्र दिले होते. ती  मान्य करून चिपळूण येथून येत्या बुधवारी रात्री 11 वाजता चिपळूण सावंतवाडी ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. आयत्या वेळी प्रवासी वाढले, तर आणखी  गाडी सोडण्याची तयारी चिपळूण आगाराने दाखविली आहे.
चिपळूण परिसरातील सिंधुदुर्गवासीयांसाठी नियमित एस.टी. नाही. त्यामुळे कोकण रेल्वे आणि दापोली-सावंतवाडी गाडीवर अवलंबून राहावे लागते. गणेशोत्सव काळात  चिपळूण ते सावंतवाडी दरम्यानचे आरक्षण उपलब्ध होत नाही. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांची गैरसोय होते. जादा गाडीने त्यांची सोय होते, असे श्री. सावंत यांनी  सांगितले.