Breaking News

शेतकरी आणि त्यांच्या मुलांच्या आत्महत्यांबाबत सरकार गंभीर नाही - धनंजय मुंडे

बारामती, दि. 18, ऑगस्ट - राज्यातील 70 टक्के भागात पावसाअभावी जनता हवालदिल झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार अजूनपर्यंत दुष्काळ जाहीर करत  नाही ही आश्‍चर्याची बाब असून शासनाने त्वरीत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. अधिवेशन  काळात सरकारमधील 2 मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आले. पारदर्शक कारभार करू असे सांगत सत्तेवर आलेले हे सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात बरबटले  असल्याची टीकाही मुंडे यांनी केली.
बारामती येथील एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुनेत्रा  पवार या उपस्थित होत्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी सध्या राज्याच्या 70 टक्के भागाला पावसाने हुलकावणी दिली आहे, अशा परिस्थितीत  सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा देणे आवश्यक असल्याची मागणी केली. विरोधकांनी कर्जमाफीसाठी पाठपुरावा केला. मात्र कर्जमाफीची घोषणा  होऊन दीड महिना उलटल्यानंतरही एकाही शेतकर्‍याला या कर्जमाफीचा फायदा झालेला नाही. अनेक शेतकर्‍यांनी दोन-तीन वेळा पेरण्या करूनही पाऊस झालेला  नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली असतांना शासन दुष्काळ जाहीर करत नाही. त्यावरून शासनाची संकुचित वृत्ती दिसून येत असल्याचे मुंडे  यांनी सांगितले.
कोणत्याही समाजाला आरक्षण न देण्याच्या विचारधारेचे हे सरकार आहे. त्यामुळे आतापर्यंत मराठा, धनगर, मुस्लीम आणि इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न रेंगाळत  पडल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. कर्जमाफी जाहीर झाल्यापासून मराठवाड्यात 135 आत्महत्या झाल्या. आता तर शेतकर्‍यांची मुलेही आत्महत्या करू लागली  आहेत. मात्र याचाही सरकार गांभीर्याने विचार करत नसल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत येणार्‍या काळात  राष्ट्रवादीच्या माध्यमातून राज्यभर आंदोलने करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.