Breaking News

देशभक्ती व समाजसेवेमुळे रा.स्व. संघाचा सन्मान करतात - रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - देशभक्ती व समाजसेवेमुळे देशातील लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सन्मान करतात , अशा शब्दात केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर  प्रसाद यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले .राहुल गांधी यांनी आज दिल्लीत रा. स्व. संघावर टीका केली होती. सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाने राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यास सुरुवात केली. निवडणुकीत जिंकू शकणार नाही म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर आपली  माणसे नियुक्त केली जात आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी अभ्यास न करता टीका करतात, असे आधी म्हणत होतो. मात्र आता ते असंबद्ध विधाने करत आहेत. राहुल गांधी यांच्या जन्माआधी भाजप अनेक  राज्यांत सत्तेत होती. जर त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली असेल, तर जनतेने त्यांना मतदान का केले नाही, असा प्रश्‍नही रविशंकर प्रसाद  यांनी विचारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आजोबा पं. जवाहरलाल नेहरू हेही आरोप करत होते, इंदिरा गांधी यांनीही रा. स्व.  संघाविरोधात मोहीम उघडली होती . मात्र या सर्व प्रयत्नांना रा. स्व . संघ पुरून उरला आहे, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.