Breaking News

‘लॉस्ट अँड फाऊंड’ चा सर्व्हर गेल्या 10 दिवसांपासून डाऊन


पुणे,दि.8 : विसर्जन मिरवणुकीला लोटलेल्या जनसा गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोरट्यांनी जवळजवळ दीड हजार मोबाईल आणि अनेक सोनसाखळ्या लंपास केल्या. दरम्यान, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या नागरिकांना पोलिसांनी ऑनलाईन तक्रार करण्याच्या नावाखाली हुसकावून लावल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. दुसरीकडे ऑनलाईन तक्रार करण्यासाठी सुरू केलेले ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चा सर्व्हर गेल्या 10 दिवसांपासून डाऊन आहे. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लक्ष्मी आणि टिळक रस्त्यासह शहराच्या मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांवर सकाळपासूनच गणेशभक्तांनी गर्दी केली होती. गर्दीमध्ये आबालवृद्धांचाही सहभाग होता. तरुण-तरुणी, आयटीयन्स, महाविद्यालयीन तरुणांसह अनेक जण कुटुंबासोबत मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांवर उभे होते. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणात गणेशभक्त आणि नागरिकांनी कसलाही विचार न करता, मोबाईल आपल्या जवळ ठेवले होते. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरांच्या टोळ्या मिरवणुकीत सक्रिय झाल्या होत्या. चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल लंपास केले. मानाच्या विसर्जन मिरवणुकींसह रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ कायम होता. बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवर चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. खिशातले मोबाईल चोरटे शिताफीने चोरत होते. गर्दीतून बाहेर आल्यानंतर कित्येकांना आपला मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या चोरीच्या घटनाही घडल्या आहेत.