Breaking News

कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर - जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल

सातारा, दि. 15, सप्टेंबर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकारी सन्मान योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातून 3 लाख 90 हजार शेतकर्‍यांनी कर्ज माफीसाठी ऑनलाईन  अर्ज भरले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 15 सप्टेंबर असून या योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही  याची दक्षता घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी व नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमार, जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.उपविभागीय  अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये उपविभागीय अधिकारी अध्यक्ष, जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी नेमलेला लेखापरीक्षक  सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विभागीय विकास अधिकारी सदस्य व विभागीय सहनिबंधकांनी तालुक्या बाहेरील नेमलेला उप/सहायक निबंधक सदस्य  असतील.तालुकास्तरीय समितीने करावयाची सर्व कर्तव्ये व जबाबदार्‍या उपविभागीय अंमलबजावणी समिती देखील पार पडेल. तसेच आवश्यक ते प्रमाणे  तालुकास्तरीय समितीच्या कामकाजावर देखरेख ठेवले. तालुकास्तरीय समिती ऑनलाईन पद्धतीने नाकारलेल्या व लाभार्थ्यांबाबत आलेल्या ऑनलाईन आक्षेप,  हरकती, सूचना तक्रारींचे निर्णय घेतील. आवश्यकतेनुसार बँक व संस्थेकडील दप्तराची पडताळणी करेल. तसेच लाभार्थ्यांच्या आलेल्या ऑनलाईन आक्षेप, हरकती,  सूचना तक्रारी यांच्या संबंधीत झालेल्या निर्णय पोर्टलवर अपलोड करतील. त्याचबरोबर तक्रारीला ऑनलाईन पद्धतीने उत्तर पाठवतील.कर्जमाफीच्या पोर्टलवर  ऑनलाईन पद्धतीने तात्पुरते नाकारलल्या लाभार्थी तसेच पोर्टलवर प्रदर्शीत केलेल्या यादीमध्ये ज्या शेतकर्‍यांच्या नावाचा समावेश नाही अशा व्यक्तीस उपविभागीय  स्तरावर असलेल्या समितीकडे दादा मागता येईल.कुटूंबातील सर्व सदस्यांनी एकच कर्जमाफीसाठी एकच अर्ज सादर करावा. स्वतंत्र अर्ज विचारात घेतला जाणार  नाही. अर्ज लिंक करण्यासाठी सेवा केद्रावर संपर्क साधावा मयताच्या थकीत कर्जात वारसांनी आपापले हिस्से बँकेकडून निश्‍चित करुन घ्यावेत. त्याधारे अर्जदारांनी  स्वत:च्या अर्जात त्या खात्याबाबतची माहिती नमूद करावी. संयुक्त खातेधारकांनी घेतलेल्या थकीत संयुक्त कर्जापैकी आपापले हिस्से बँकेकडून निश्‍चित करुन घ्यावेत.  त्याआधारे अर्जदारांनी स्वत:च्या अर्जात त्या खात्याबाबतची माहिती नमूद करावी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकारी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2017 अशी आहे. तरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज भरुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे  आवानही त्यांनी यावेळी केले.