Breaking News

यावर्षी ’मानाच्या गणपतींनी घेतला 15 मिनिटे अधिकचा कालावधी

पुणे, दि. 07, सप्टेंबर - अनंत चतुर्दशीला होणार्‍या मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक ‘याची देही, याची डोळा’ साठवून घेण्यासाठी देश-विदेशातून नागरिक  येतात. पालिकेच्यावतीने लवकर विसर्जन मिरवणूका संपविण्याचे आवाहन केले होते. मात्र मानाच्या गणपतींनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 15 मिनिटे अधिक कालावधी  घेतला आहे.
मंगळवारी सकाळी पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूक ही फुलांची आरास, ढोलताशाचा गजर, सनई चौघड्यांचे सूर अशा मंगलमय वातावरणात पार  पडली. पुणे पालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मानाच्या गणपतींच्या मिरवणूका लवकर संपविण्याचा निर्धार करण्यात आला होता. तरीही या  मिरवणूका गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 मिनिटे उशिरा संपल्या आहेत. मागील वर्षी 9 तास 15 मिनिटांनी संपलेल्या या मिरवणूकांनी यंदा 9 तास 28 मिनिटे इतका  कालावधी घेतला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकींची सुरुवात झाली होती. त्याप्रमाणे पहिला मानाचा गणपती अर्धा तास आधी आला होता.  तरीही विसर्जन मात्र 15 मिनिटे उशीरा करण्यात आले. मंगळवारी दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनी कसबा गणपतीचे, 5 वाजून 35 मिनिटांनी तांबडी जोगेश्‍वरी, 6  वाजून 11 मिनिटांनी गुरूजी तालीम, 6 वाजून 50 मिनिटांनी तुळशीबाग गणपती तर सात वाजून 28 मिनिटांनी केसरीवाडा गणपतीचे विसर्जन झाले. आज  दुपारपर्यंत काही गणेश विसर्जन मिरवणुका चालू होत्या. त्यामुळे यंदा पालिकेच्या आवाहनाला गणेश मंडळांनी फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आले आहे.