Breaking News

शिक्षणक्षेत्र महामंडळाचे पुणे येथे 18 रोजी उपोषण

सातारा, दि. 07 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळातर्फे विविध मागण्यासाठी सोमवार, दि. 18 सप्टेंबर रोजी दुपारी 1  वाजल्यापासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. आयुक्त शिक्षण व शिक्षण संचालक, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे हे उपोषण  होणार असल्याची माहिती शिक्षक संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय धुमाळ यांनी दिली.
अहमदनगर येथे 17 ऑगस्ट रोजी राज्यकार्यकारणी सभेतील निर्णयानुसार नुकतेच पुणे येथे बैैठक झाली. त्यावेळी महामंडळाचे अध्यक्ष एस. डी. डोंगरे, सहकार्यवाह  शिवाजी खांडेकर, उपाध्यक्ष भागवत पवळे, आरती कुंभार, कोषाध्यक्ष सुखदेव कंद, विनोद गोरे, बसाप्पा जवारी उपस्थित होते.
संजय धुमाळ म्हणाले, महामंडळाने घेतलेल्या बेमुदत उपोषणाच्या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटना, शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांचा पाठींबा मिळत  असून सर्व पक्षीय मंत्री व आमदारांचाही पाठींबा मिळविण्याचा प्रयत्न संबंधित जिल्ह्यातील पदाधिकारी करत आहेत. शिक्षकेत्तर सेवकांच्या भरतीवर 2003 पासून बंदी  असल्याने शिक्षकेत्तर सेवकांची संख्या जवळपास 50 टक्के कमी झाल्याने कार्यरत सेवकांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण आहे. जिथे तीन चार लिपीक काम करत  होते. तिथे एक लिपीक काम करत आहेत. अनेक शाळांत शिक्षकांना लिपीकाचे काम करावे लागत आहे. प्रयोगशाळा परिचर, सहाय्यक पदे रिक्त आहेत. शिपाई  संख्या कमी झाल्याने स्वच्छतेची कामे विद्यार्थ्यांना करावी लागत असल्याने त्याचा गुणवत्तेवर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी कामाच्या अतितणावामुळे शिक्षकेत्तर  सेवकांना विविध दुर्धर आजार होत आहेत याबाबींचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा.
महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर म्हणाले, संघटनेच्या सर्व मागण्या मंजूर होवून लेखी आदेश निघाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत हे बेमुदत उपोषण मागे  घेतले जाणार नाही. याचबरोबर या उपोषणास राज्यातून दररोज 5 हजार शिक्षकेत्तर सेवक उपोषणास पाठींबा देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे नियोजन केले  जाणार आहे. या बैठकीतील शिक्षकक्षेत्र महामंडळ सर्व पदाधिकारी उपस्थित होते.