Breaking News

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; पुरस्काराचे वितरण 18 सप्टेंबरला सोलापुरात

पुणे, दि. 14, सप्टेंबर - राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून यंदाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून राज्यातील 107 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात  येणार आहे. या पुरस्काराचे वितरण 18 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे केले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. 
राज्य शासनाच्या वतीने 1962-63 सालापासून राज्य शासनाकडून आदर्श शिक्षक पुरसकार देण्यात येतात. यंदाच्या वर्षी 37 प्राथमिक, 39 माध्यमिक, 18  आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणारे, 8 सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, 2 कला व क्रीडेचे शिक्षक, 1 अपंग शिक्षक, 1 गाईड शिक्षक व 1 स्काऊट शिक्षक अशा  107 शिक्षकांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी देण्यात येणारे हे पुरस्कार यंदा अनंत चतुर्थीमुळे 18 सप्टेंबर रोजी देण्यात  येणार आहेत. दहा हजार रुपये असे या पुरस्काराची रक्कम आहे. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढ देण्याऐवजी एक लाख  रुपये रोख देण्याचा निर्णयही याआधीच शासनाने घेतला आहे.
पुण्यातून मंगला कटारे या अभिनव विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिकेला हा पुरस्कार जाही झाला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी येथील  सहाय्यक शिक्षक संभाजी ठुबे यांना तसेच दौंड येथील भैरवनाथ विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अंकुश काळखैरे यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  आदिवासी विभागांतर्गत खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहाय्यक शिक्षक किसन गिरंगे यांना तर विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार सणसवाडी येथील  जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पाटीलबुवा मिलगुडे यांना या पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणार्‍या या पुरस्कासारासाठी तब्बल दोन कोटींचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. 2016-17 या वर्षासाठी शासनाने  पुरस्काराखातर 1 कोटी 81 लाख 50 हजारांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये शिक्षकांना देण्यात येणारी पुरस्काररुपी रक्कम, समारंभाचा खर्च आदींचा समावेश  आहे.