Breaking News

वीज अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांच्या कुटुंबाला 4 लाखांची मदत : ऊर्जा मंत्री

धुळे, दि. 16, सप्टेंबर - धुळे शहरात मंदिरास रंग देताना विजेचा धक्का बसून मृत्यू पावलेल्या दोन आदिवासी तरुणांच्या कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपयांचे अनुदान  देण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज दुपारी ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे  रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, महापौर कल्पना महाले, आमदार काशिराम पावरा, महावितरणचे सहव्यवस्थापकीय  संचालक ओमप्रकाश बकोरिया, जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर आदी उपस्थित होते.
ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले, या अपघातात जखमी झालेल्या तरुणांवरील उपचाराचा खर्च वीज कंपनीने द्यावा. तसेच नागरिकांनी हाय टेन्शन  वाहिनीच्या जवळ घरे बांधू नयेत. याबाबतचा कायदा पाळावा, असेही आवाहन त्यांनी केले. आढावा बैठकीत या दोन तरुणांच्या मृत्यूचा मुद्दा हिरामण गवळी व सुनील  बैसाणे यांनी उपस्थित केला होता. याबाबत प्राथमिकस्तरावर 20 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा प्राथमिक अहवाल वरीष्ठांना  सादर करण्यता आला आहे, असे वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
ग्राहकांना सरासरी वीज बिल देणार्‍या एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. तसेच 2025 पर्यंत शाश्‍वत  वीज पुरवठा मिळण्यासाठी आगामी 2 वर्षांत 170 कोटी रुपयांच्या निधी खर्च करण्यात येणार आहे. पॉवर फॉर ऑल योजनेंतर्गत आदिवासी बहुल जिल्ह्यातील दुर्गम  भागातील प्रत्येक घरात वीज पोहोचण्यासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, असेही ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी आमदार  काशिराम पावरा, जिल्हा परिषद सदस्य डॉ. तुळशीराम गावित, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. जितेंद्र ठाकूर, नगरसेवक संजय गुजराथी, प्रतिभा चौधरी,  जयश्री अहिरराव आदींनी आपल्या समस्या मांडल्या.
खासदार डॉ. गावित यांनी वनहक्क कायद्यांतर्गत जमिनी मिळालेल्या शेतकर्‍यांना सिंचनासाठी प्राधान्याने वीज जोडणी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.