0

पुणे,दि.8 : आपल्या स्वररचनांनी ज्यांनी चित्रपटसृष्टवर्णकाळ गाजवला, त्या संगीतकार सी. रामचंद्र यांची जन्मशताब्दी 2018 मध्ये सुरू होत आहे. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आपल्या ‘चित्रपट खजिन्या’तून तबब्ल 82 वर्षांपूर्वीचा ‘नागानंद’ हा चित्रपट रसिकांसमोर आणण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवलेल्या सी. रामचंद्र यांनी या चित्रपटात चक्क अभिनय केला आहे. त्यांनी या चित्रपटात ‘जिमूतवाहन’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संग्रहालयाच्या चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला जाईल, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश चांदवणकर याप्रसंगी सी. रामचंद्र यांच्या कला योगदानाविषयी बोलणार आहेत. चित्रपट जेव्हा बोलपट झाले, त्या सुरुवातीच्या काळातला हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या कोसळला होता. मात्र, तेव्हा पौराणिक चित्रपटांवर दिला जाणारा भर या चित्रपटावरही असल्याचे लक्षात येते. विशेषत: त्यातील स्पेशल इफेक्ट्स आणि ट्रिक सीन्स यांचे प्रेक्षकांना अतिशय आकर्षण वाटत असे. ‘नागानंद’ हा चित्रपट सातव्या शतकातील राजा हर्ष आणि नायिका मलयावती (आझमबाई) यांची कथा सांगतो आणि नाग वंश आणि गरूड वंश यांच्यातील संघर्षाची कथा मांडतो. ‘नागानंद’ या मूळ संस्कृत नाटकावरूनच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये 13 गाण्यांचा समावेश होता. सी. रामचंद्र यांनी त्यातील दोन गीते गायिली आहेत आणि ती वामनराव सडोलीकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. सी. रामचंद्र यांच्या ‘माझ्या जीवनाची सरगम’ या आत्मचरित्रात ‘नागानंद’विषयी गमतीदार माहिती आहे. सी. रामचंद्र म्हणतात, ‘मी या चित्रपटात मुख्य भूमिका केली, पण हा चित्रपट मला पाहताच आला नाही. पहिल्याच दिवशी मी थिएटर मालकाला सांगितले की, हा चित्रपट मला पाहायचा आहे, कारण त्यात मी काम केले आहे. तेव्हा मला सांगण्यात आले की, चित्रपट पूर्णपणे पडला आहे. जे 10 वयस्कर प्रेक्षक चित्रपट पाहण्यास आले होते, तेही मध्यंतरात निघून गेले आहेत. त्यामुळे चित्रपट पूर्ण दाखवण्यातही आलेला नाही. या निराशाजनक अनुभवानंतर मी कधीच चित्रपटात अभिनय करायचा नाही, असे ठरवले आणि संगीताकडे वळलो.’

Post a Comment

 
Top