Breaking News

मुद्रा बँक योजनेतून कर्ज घेऊन यशस्वी उद्योजक व्हा : मांढरे

सातारा, दि. 07 (प्रतिनिधी) : तरुणांसाठी मुद्रा बँक योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या बँकेशी किंवा ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे, त्या बँकेशी  संपर्क करुन मुद्रा बँक योजनेतून कर्ज घ्या आणि यशस्वी उद्योजक बना, असे आवाहन दहिवडी येथील उप कोषागार अधिकरी संतोष मांढरे यांनी केले.
फलटण येथील रविवार पेठ तालिम मंडळात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे संवादपर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मांढरे बोलत होते. याप्रसंगी रविवार पेठ  तालिम मंडळाचे अध्यक्ष हेमंत निंबाळकर, निलेश शहाणे व मंडळाचे कार्यकर्ते बजरंग खलाटे, मनोज माने, अमित कदम, स्वप्निल जंगम, विक्रम माने, मनोज  गजफोडे, नंदू गजफोडे, निखिल पवार, संकेत चव्हाण, सचिन तारळकर, रविंद्र लिपारे तसेच दुर्गामाता मंडळाच्या सर्व महिला, जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रतिनिधी  रुपाली तारळकर उपस्थित होते.
मांढरे म्हणाले, देशामध्ये होतकरु, बुध्दीमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहे, परंतू त्यांना कौटुंबीक पार्श्‍वभूमी  नसल्यामुळे एखादा लहान उद्योग अथवा व्यवसाय उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण भांडवालाची असते. कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय  उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा होणे गरजेचे आहे. या सर्वांचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यातून  उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने पंतप्रधानांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाने मुद्रा बँक योजना सुरु केली आहे. या योजनेमार्फत बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन  त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. शिशु गट 10 हजार ते 50 हजार, किशोर गट 50 हजार ते 5 लाख आणि तरुण गट 5 लाख ते 10 लाख अशा तीन  गटामध्ये कर्ज वितरीत केले जाते. या योजनेंतर्गत जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था आदींमार्फत कर्ज देणे अपेक्षित  आहे. सर्वात महत्वाचे या योजनेनुसार कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्याचे जीवनमान उंचविण्यासाठी  अर्थसहाय्य देण्यात येते. अधिक माहितीसाठी आपण आपल्या नजीकच्या बँकेशी किंवा ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे, त्या बँकेत संपर्क करावा, असे आवाहन  मांढरे यांनी केले. यावेळी निलेश शहाणे यांनी मान्यवरांना लोकराज्य व आपला जिल्हा सातारा पुस्तिकेचे अंक देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार  रुपाली तारळकर यांनी मानले.