Breaking News

ब्ल्यू व्हेल गेम ; उच्च न्यायालयाने गुगल , फेसबुक ला खडसावले

मुंबई, दि. 15, सप्टेंबर - ब्ल्यू व्हेल या गेमसंदर्भात गुगल , फेसबुक या समाज माध्यमांनी एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करावे असा आदेश मुंबई उच्च  न्यायालयाने आज दिला. ब्ल्यू व्हेल संदर्भात सिटीझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल  करण्यात आली आहे . त्या संदर्भात उच्च न्यायालयाने गुगल , फेसबुक ला नोटीस बजावली होती . या नोटिशीला उत्तर देण्यासाठी आणखी वेळ द्यावा अशी मागणी  गुगल , फेसबुक कडून करण्यात आली होती . त्यावर न्यायालयाने मुलांचे जीव जात असताना तुम्ही नोटिशीला उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मागत आहात यावरून  आपल्याला या विषयाचे गांभीर्य जाणवत नाही , असे दिसते अशा शब्दात न्यायालयाने या समाज माध्यमांना फटकारले . लवकरात लवकर उत्तर सादर करा ,  असेही न्यायालयाने बजावले . लहान मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा हा गेम तातडीने बंद केला जावा अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.  तसेच या खेळापासून मुलांना रोखण्यासाठी पालकांनी काय करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी सरकारने हेल्पलाईन सुरु करावी असेही याचिकेत नमूद करण्यात आले  आहे.
या याचिकेवर उच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे , ती काय करतात , कुठे जातात याची  माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे , असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते.