Breaking News

मला कधी जात विचारलीच नाही - निर्मला यादव

पुणे, दि. 14, सप्टेंबर - सोवळे मोडल्याचा आरोप करत हवामान विभागाच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांनी निर्मला यादव यांच्या विरोधात तक्रार केली होती.  मात्र, खोले यांनी मला कधी जात विचारली नाही. तसेच त्यांच्याकडे पूजाअर्चा करणारे गुरुजी व खोले यांच्यात काय बोलणे झाले हे मला माहित नाही. तसेच या  प्रकरणामुळे मला भंयकर मानसिक त्रास झाला असल्याचा खुलासा निर्मला यादव यांनी केल्याने प्रकरणाला वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मेधा खोले यांच्या तक्रारीनुसार त्यांना गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करणारी सुवासिनी ब्राह्मण महिला हवी होती. त्यानुसार त्यांच्याकडे पूजाअर्चा  करणार्‍या जोशी गुरुजींनी त्यांच्याकडे निर्मला कुलकर्णी नावाची महिला पाठवली होती. त्यावेळी खोले यांनी निर्मला यांच्या घरी जाऊन ही महिला ब्राह्मण आहे की,  नाही याची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी तिला स्वयंपाकाचे काम दिले असल्याचे म्हटले आहे. मात्र निर्मला यादव यांनी या तक्रारीचे खंडन करताना सांगितले की,  मेधा खोले यांनी मला माझी जात कधी विचारली नव्हती आणि जोशी गुरुजींनीही तशी माहिती मला दिली नव्हती. मी मोलकरणीचे काम करत नाही, मी केवळ चारच  वेळा त्यांच्याकडे स्वंयपाकाचे काम केले आहे. माझा कॅन्टीनचा व्यवसाय आहे. मागणी प्रमाणे पदार्थ तयार करून देण्याचे काम मी करते.जोशी यांनी देखील त्यावेळी  मला फक्त स्वंयपाकासाठी खोले यांच्याकडे पाठवले होते. त्यावेळी जातीचा प्रश्‍नच उपस्थित झाला नव्हता. मात्र, जोशी आणि खोले यांच्यात काय बोलणे झाले यांची  मला कल्पना नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.