Breaking News

मुख्यमंत्री फडणवीस बँकांचे एजंट - बच्चू कडू


अक्कलकोट,दि.8 : राज्य शासनाने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ बोगस असून मुख्यमंत्री बँकांचे एजंट आहेत. या कर्जमाफीत माफी कमी, वसुली जास्त’ आहे, असा घणाघाती आरोप अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना गुरुवारी केला. चुंगी (ता. अक्कलकोट) येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. कडू म्हणाले, कर्जमाफी योजनेत केवळ छत्रपतींच्या नावाचा वापर झाला आहे. प्रत्यक्षात तसे काही नाही. केवळ दीड लाखांची कर्जमाफी करून सरकारने शेतकर्‍यांची दिशाभूल केली आहे.याचा फायदा बँकांना होणार आहे. सरकारला शेतकर्‍यांचा इतका कळवळा असेल तर 2016-17 ची कर्जमाफी का केली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या शेतकर्‍याचे कर्ज चार लाख असेल तर त्याला सरळ सरळ दीड लाख माफ नाहीत. त्यासाठी त्याला आधी अडीच लाख भरावे लागतात. मग ही कसली माफी ? ही तर वसुली. मुख्यमंत्री फडणवीस हे बँकांचे एजंट आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. गेल्या 70 वर्षांत केवळ सत्ता बदलली. प्रश्‍न जैसे थे आहेत. हे सरकार उद्योगपतींबाबत फायदेशीर निर्णय घेते. मुंबई-नागपूर, मुंबई-गुजरात मेट्रोसाठी कोट्यवधी खर्च होतात, मग शेतकर्‍यांसाठीच अटी का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशात, राज्यात धर्म-जातीचे गुलाम झालेले अनेक लोक आहेत, पण तुम्ही कुणाचेही गुलाम होऊ नका, स्वाभिमानाने जगा. आता ही सगळी व्यवस्था बदलण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.प्रस्तावित नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावरही आमदार कडू यांनी टीका केली. शेतकर्‍यांना देशोधडीला लावून उद्योगपतींचा फायदा करण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.