Breaking News

ऑनलाईन गेम प्रकरणी उच्च न्यायालयाकडून पालकांची कानउघडणी


मुंबई,दि.8 : आपल्या पाल्याची जबाबदारी पालकांवर असताना ऑनलाईन गेमसाठीही सरकारला कसे दोषी ठरवले जाऊ शकते, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान विचारला. आपली मुले कुठे जातात, काय करतात, याकडे लक्ष देण्याची पालकांची जबाबदारी असून त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या खटल्याची सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब करण्यात आली.
‘ब्ल्यू व्हेल’ गेम विरोधात ‘सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर ऍण्ड एज्युकेशन’ या स्वयंसेवी संस्थेकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत गुगल, फेसबूक, याहू यांच्यासह मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेलाही प्रतिवादी करण्यात आले आहे. या गेमशी संबंधित तक्रारी व समस्यांच्या निवारणासाठी प्रशासनाने एक हेल्पलाईन सुरू करावी. या माध्यमातून लहान मुले व त्यांच्या पालकांना त्वरित मदत करता येईल, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली.