Breaking News

सोेवळ्यातलं ब्राम्हण्य आणि वैज्ञानिकतेला कलंक

दि. 09, सप्टेंबर - पुण्याची ओळख पुरोगामित्त्त्वाचा, वैज्ञानिकतेचा वसा घेतलेलं शहर अशी केली जात होती. या शहरानं सामाजिक सुधारणांचं पाऊल टाकलं.  महात्मा फुले, न्या. महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी आगरकर यांनी पुण्यातून सामाजिक सुधारणांचं रणशिंग फुंकलं. जातिअंताच्या लढाईचं शिवधनुष्य अनेकांनी  आपल्या अंगाखांद्यावर घेतलं. कोणत्याही गोष्टीमागं कार्यकारणभाव असतो, असं विज्ञान परोपरी सांगत असतं. भारतीय राज्यघटनेनं जाती, धर्माच्या आधारावर  कोणालाही नोकरी नाकारता येणार नाही, असं सांगितलं. असं असताना घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून सोवळे मोडले, म्हणून गुन्हा दाखल करण्याचा  प्रकार याच पुण्यात घडला आहे. तोही एका नामवंत हवामानशास्त्रज्ञ असलेल्या महिलेकडून ते ही दुसर्‍या महिलेबाबत असं घडल्यानं आश्‍चर्य व्यक्त होत आहे.  उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी तरी किमान सरकारचा पगार घेताना राज्यघटनेनं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी; परंतु राज्य  घटनेपेक्षा धार्मिक पगड्यानं अजूनही मनं कशी जातीभेदानं पुरेपूर भरलेली आहेत, हे अशा घटनांतून प्रकर्षानं जाणवतं. या उच्चपदस्थ महिलेचं नाव डॉ. मेधा खोले  असं आहे. त्या हवामानशास्त्र विभागाच्या अधिकारी आहेत. त्यांच्या मनात ब्राम्हण्य कसं ठासून भरलेलं आहे, हे डॉ. खोले यांच्या उदाहरणातून पुढं आलं.
डॉ. खोले यांच्या घरी दरवर्षी गौरी गणपती बसतात. घरी आई-वडिलांचे श्राद्ध विधीही असतात. त्यासाठी त्यांना सोवळ्यातील स्वयंपाक करणारी सुवासिनी  असलेली बˆाह्मण स्त्री हवी होती. खरंं तर स्वयंपाक येण्यासाठी स्त्री कोणत्या जातीची आहे, यापेक्षा ती सुगरण आहे, की नाही, तिच्या हाताला चव आहे, की नाही,  तिचं आरोग्य कसं आहे, ती स्वच्छता पाळते, की नाही, या बाबी पाहायला हव्या होत्या; परंतु तसं न करताच त्यांनी घातलेली अटही त्या अजूनही 17 व्या शतकात  वावरत असल्याचा प्रत्यय देणार्‍या होत्या. 2016 मध्ये मे महिन्यात त्यांच्याकडे निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री आली होती. तिनं देवाच्या कार्यक्रमाचे स्वयंपाक  करते, असं सांगितलं होतं. तिच्या माहितीवरून डॉ. खोले यांनी प्रत्यक्ष धायरी येथील तिच्या घरी जाऊन चौकशी केली होती. त्या बˆाह्मण आहेत, की नाहीत याची  खात्री केली. असं असेल, तर डॉ. खोले यांनी नंतर तक्रार करण्यात काहीही अर्थ नाही. एकतर चौकशी करण्यात त्या फेल झाल्या, असं म्हणायला हवं. केवळ  ब्राम्हण आहे, म्हणून एखाद्याला काम देणं किंवा नाकारणं हे दोन्हीही घटनेशी विसंगत आहे. डॉ. खोेले यांनी चौकशी केल्यानंतर लगेचच निर्मला यांना घरच्या धार्मिक  कार्याच्या स्वयंपाकासाठी बोलावलं. मे 2016 मध्ये वडीलांच्या श्राद्धाच्या वेळी तसंच सप्टेंबर महिन्यात गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी तसंच 2017 मध्ये  वडीलांच्या श्राद्धासह गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. दोन वर्षांत त्यांनी एकूण सहा वेळा स्वयंपाक केला.  बुधवारी निर्मला या बˆाह्मण नसून मराठा असल्याचं खोले यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितलं. याबाबत खोले यांनी पुन्हा निर्मला यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्या  वेळी निर्मला यांनी त्यांचं नाव निर्मला यादव असल्याचं सांगितले. त्या वेळी निर्मला यांना त्यांनी कुलकर्णी असं खोटं नाव का सांगितले,  आमच्या घरी केवळ बˆाह्मण  समाजातील सुवासिनी बाईनं केलेलाच स्वयंपाक चालतो अशी विचारणा केली. त्यावरून  निर्मला यांनी दमदाटी आणि शिवीगाळही केल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी  सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली आहे.
डॉ. खोले यांच्यासारख्या उच्चपदस्थ आणि बर्‍यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या बाईंच्या नादी साधं स्वयंपाकाचं काम करणारी बाई कशाला लागेल? एक वेळ  पोटासाठी जात लपवली, म्हणून त्या बाईनं केलेला स्वयंपाक रुचकर झाला नाही का? गौरी, गणपतीनं एखाद्या अब्राम्हण बाईनं केलेला स्वयंपाक  आणि नैवद्य  नाकारला का? डॉ. मेधा यांच्या आईवडीलांना दाखविलेला वर्षश्राद्धाचा नैवद्य त्यांनी परत पाठविला का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं त्यांनी द्यायला हवीत. वैज्ञानिक  असलेल्या बाईनं या प्रत्येक घटनांमागचा कार्यकारणभाव जाणून घ्यायला हवा होता; परंतु त्यांच्या मनातून अजून जात जात नाही. त्यांची सडकी मानसिकता अजून  दूर व्हायला तयार नाही.
स्वयंपाकी बाईनं असा कोणता गंभीर गुन्हा केला, म्हणून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी डॉ. मेधा यांनी पदाची प्रतिष्ठा पणाला लावली. या प्रकाराची नेमकी  तक्रार कशी दाखल करुन घ्यावी, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. तक्रार करू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून तसंच समाजातील मान्यवरांकडून  डॉ. खोले यांची समजूत घालूनही त्या अडून बसल्या होत्या. यावरून त्यांची मानसिकता लक्षात यायला हवी. निर्मला यांनी मात्र आपण खोटे नाव सांगितलं नसल्याचं  म्हटलं आहे. त्यांनी दोघींनी परस्परांविरुद्ध फिर्यादी दिल्या आहेत. ज्या गुरुंजींमुळं काम मिळालं, त्या गुरुजींनी थेट एक वर्षानंतर डॉ. खोले यांचे कान भरून दिले.  त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करायला हवा. तसंच जातपात मानणार्‍या डॉ. खोले यांना केंद्र सरकारनं पदमुक्त करायला हवं; परंतु सरकार तसं करणार नाही.  कारण ते ही उच्च-नीचता, जातीच्या उतरंडीचं समर्थन करणारं आहे.