Breaking News

पालकसचिव सिंह यांनी घेतली निंबोडी दुर्घटनेतील मृत मुलांच्या पालकांची भेट

अहमदनगर, दि. 07, सप्टेंबर - सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रश्‍नांचा आढावा  घेतला. शेतकरी कर्जमाफी,जिल्ह्यातील पर्जन्यमान,अल्प पाऊस झालेली गावे, जलयुक्त शिवार अभियानाबरोबरच जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गांची कामांची  सद्यस्थिती,शिर्डी येथे होणार्‍या श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यात होणार्‍या कामांची माहिती त्यांनी जाणून घेतली.पालकसचिव सिंह यांनी निंबोडी येथे जाऊन  शाळा दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांचीही भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि शाळा परिसराचीही पाहणी केली.
पालकसचिव यांनी आज विविध कामांचा आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन,जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा,जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने,महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे,श्री साईबाबा मंदिर विश्‍वस्त व्यवस्था शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल  यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम,उपजिल्हाधिकारी साधना सावरकर,वामन कदम,अरुण आनंदकर,जिल्हा  उपनिबंधक(सहकारी संस्था)अनिलकुमार दाबशेडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडितराव लोणारे आदींची यावेळी उपस्थिती होती.यावेळी पालकसचिव सिंह यांनी  जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी अर्ज केलेले शेतकरी,एकूण थकबाकीदार शेतकरी,तात्काळ 10 हजार रुपयांचे कर्ज घेतलेले शेतकरी आदींची माहिती घेतली.कर्जमाफीसाठी  ऑनलाईन नोंदणी करावी लागते.त्यासाठी आवश्यक असणार्‍या मशीन्स महाऑनलाईन केंद्रांना तात्काळ देण्यात येतील,असे त्यांनी सांगितले.ई-नोंदणी करताना  येणार्‍या तांत्रिक अडचणींची माहिती त्यांनी घेतली. सर्व्हर डाऊन होण्याच्या कालावधी किती होता,किती दिवस मशीन्स बंद पडले,याची माहिती पाठविण्याचे निर्देश  त्यांनी दिले.ठिकठिकाणी कॅम्प लावून अधिकाधिक अर्ज विहित मुदतीत भरुन घ्या,जेणेकरुन त्याचा लाभ शेतकर्‍यांना होईल,अशा सूचना त्यांनी दिल्या.
खरीप पीक कर्ज वाटपाची गती वाढवा.यासंदर्भात सर्व बँकांची बैठक घेऊन त्यांना कर्जवितरणाबाबत निर्देश द्या आणि त्याचा अहवाल राज्य शासनाकडे  पाठवा.बँकांच्या कामगिरीबाबत आपण रिझर्व्ह बँकेलाही पत्रव्यवहार करु,असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील एकंदरीत पीकपद्धती,वातावरण,हवामान याचा अभ्यास  करुन एक दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली.ज्याठिकाणी आतापर्यंत कमी पाऊस झाला,तेथील परिस्थिती काय आहे,हे त्यांनी जाणून  घेतले.जिल्ह्यात किती ठिकाणी टँकर सुरु आहेत,आगामी कालावधीत पाऊस नाही झाला,तर किती गावांना पाणीटंचाईची झळ बसेल,याचा आढावा घेण्याच्या सूचना  त्यांनी दिल्या. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अशा ठिकाणी कामे सुरु आहेत का, नसल्यास लोकसहभाग आणि शासन यंत्रणेच्या माध्यमातून काम हाती घेण्याची  सूचना त्यांनी केली.जिल्ह्यातून जाणारे विविध महामार्ग,त्यांच्या कामांची सद्यस्थिती, विविध रस्त्यांच्या कामांची स्थिती आणि समृद्धी महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत  त्यांनी माहिती घेतली.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम,पाटबंधारे,कृषी,महसूल,सहकार,जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकी नंतर  पालकसचिव सिंह यांनी निंबोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन दुर्घटनाग्रस्त वर्गाची पाहणी केली.त्यानंतर त्यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या  वैष्णवी पोटे,रहाणे आणि श्रेयस,सुमीत भिंगारदिवे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.