Breaking News

सिंधुदुर्ग काँग्रेसची जिल्हा कार्यकिरणी बरखास्त

सावंतवाडी,दि.17 : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आणि कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत राज्याचे माजी मंत्री भालचंद्र ऊर्फ भाई सावंत यांचे पुत्र असून ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षसंघटनेचे काम पाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस म्हणजे नारायण राणे असे समीकरण मानले जात होते. पक्षीय पदाधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, काही पंचायत समित्या, नगरपालिका, नगर पंचायतींवर श्री. राणे यांना मानणारे कार्यकर्तेच निवडले गेले होते. गेल्या काही दिवसांपासून श्री. राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. श्री. राणे यांनी त्याबाबत स्पष्ट काहीही सांगितले नसले, तरी त्यांनी इन्कारही केला नव्हता. या घडामोडी घडत असताना गेल्या आठवड्यात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार हुसेन दलवाई यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काही बैठका घेतल्या. या बैठकांना श्री. राणे यांना बोलाविण्यात आले नव्हते. त्यावरून मोठा गदारोळ झाला. श्री. दलवाई यांनी सावंतवाडीत आयोजित केलेल्या बैठकीला आता जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले विकास सावंत उपस्थित होते. त्यांनीही तेव्हा ती बैठक आपण बोलाविली नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या बरखास्तीमागे नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा अर्थ लावू नये. त्याचा काहीही संबंध नाही, असे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.