Breaking News

तरुणांच्या टोळीयुद्धाने पाथर्डी शहर भयभीत !

अहमदनगर, दि. 16, सप्टेंबर - शहरालगत असणार्‍या तनपुरवाडी येथील तरुणावर बुधवारी सकाळी प्राणघातक करण्यात आलेला हल्ला, त्यानंतर त्या तरुणाच्या गावातील तरुणांनी मोठा जमाव जमवून शहरातील बंद पाडलेली दुकाने, अनेक व्यापार्‍यांनी घाबरून दुकाने बंद करणे या सर्व घटना शांतताप्रिय अशा पाथर्डी शहराला कलंकित करणार्‍या आहेत. स्थानिक पोलिसांचा, धाक राहिला नसल्याने टोळीयुद्धांनी पुन्हा डोके वर काढले आहे. या टोळीयुद्धांनी पाथर्डी शहर मात्र कमालीचे भयभीत झाले आहे. 
 बुधवारी दि.13 सकाळी मागील भांडणाच्या कारणावरून तनपुरवाडी येथील सतीश मोरे याला शहरातील बाबू धोत्रेे, अमोल धोत्रे, शंकर पवार, राहुल धोत्रे, आदींनी जबर मारहाण केली. संबंधितांविरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. ही भांडणे सोडविण्यास गेलेल्या सचिन पवार या तरुणावर आरोपींनी लाकडी दांडके व दगडांच्या साहाय्याने हल्ला केल्याने तो जीवाला मुकला. या घटनेनंतर तनपुरवाडी येथील तरुणांचा मोठा जमाव शहरातील बाजारपेठेत फिरताना पाहून अनेक व्यापार्‍यांनी दुकाने बंद करून घेतली.