Breaking News

फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे नवी मुंबईत स्वागत


नवी मुंबई, दि. 07, सप्टेंबर - फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे नवी मुंबईत डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियमवर आज जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय राज्य मंत्री बाबुल सुप्रीयो, युवासेना प्रमुख आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, क्रीडा मंत्री विनोद तावडे, डी.वाय.पाटील स्पोर्ट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महापालिकेने या स्पर्धेसाठी 10 कोटी रुपये खर्च केले आहे; मात्र आज या ट्रॉफीच्या स्वागत समारंभात महापौर सुधाकर सोनवणे यांना डावल्यात आले. शहराचे प्रथम नागरिक असतांनाही त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण फिफाच्या व्यवस्थापनाने दिले नाही. दरम्यान या स्पर्धेचे 8 सामने डी.वाय.पाटील स्टेडियमवर होणार असून 18 ऑक्टोबर रोजी 16 व्या फेरीचा व 25 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचा सामना होणार यात होणार आहे. ट्रॉफीच्या स्वागतासाठी सदर स्टेडीयममध्ये सामना झाला. यामध्ये कार्लोस क्लाल्डरामा, फर्नांडो मॉरिएन्टेस, बालादेवी, बेनबेन देवी, इमॅन्युएल अनुनीके आदी आंतरराष्ट्रीय किर्तीच्या फुटबॉल पटूंचा समावेश होता.