Breaking News

वैद्यकीय व्यवसायाचे स्वास्थ व्हेंटीलेटरवर

कुलटागीरी थोपविण्यासाठी सज्जन वैद्यांनी पुढे येण्याची गरज

कुमार कडलग/ नाशिक, दि. 16, सप्टेंबर - रूग्णाच्या मृत्यूस जबाबदार धरून नातेवाईकांनी हल्ला केला तर तमाम वैद्यकीय व्यवसाय बंधू एकञ येऊन हल्याचा प्रतिकार करतात, मात्र एखाद्या डॉक्टरने वैद्यकीय व्यवसायाचे सारे संकेत पायदळी तुडविले, आजाराचे खोटे निदान केले, गंभीर आजाराची भिती दाखवून रूग्णाच्या नातेवाईकांच्या खिशावर दरोडा टाकणार्या डाक्टरला जाब विचारण्याची,त्याला बहिष्कृत करण्याचे धाडस का दाखविले जात नाही.नाशिक आणि अहमदनगर शहरात उघड झालेल्या दोन गंभीर घटना वैद्यकीय व्यवसायाची नितीमुल्ये कशी घसरली आहेत याचे मुल्यमापन करतात.पोटाची खळगी भरण्यासाठी स्ञीत्व बाजारात मांडणार्या हतबल मजबूरी सुध्दा अर्थकारणासाठी हा स्तर गाठत नाही.पविञ मानला जाणारा, देवकार्य म्हटला गेलेला हा व्यवसाय आणखी बदनाम होण्याआधी या व्यवसायातील सज्जन मंडळींनी या दुष्प्रवृत्तींच्या नाकात वेसन घालण्याचे धाडस दाखविणे आता अत्यावश्यक बनले आहे.वैद्यकीय व्यवसायातील ही कुलटागीरी थांबविण्यासाठी समाज आपल्या पातळीवर काम करीत आहे,या व्यवसायातील सज्जनांनी हातभार लावणे अपेक्षित आहे.अशा प्रवृत्तींवर कृतीसापेक्ष सदोष मनुष्यवध,फसवणूक करून लुटमार करणे,ग्राहक संरक्षण कायदा अशा कलमांप्रमाणे गुन्हे दाखल करायला हवेत.
डॉक्टर म्हणजे   देवाचा अवतार नाही,प्रयत्न करणे आमच्या हाती आहे.यश देणे त्याच्या हाती.अशा पध्दतीने वैद्यकीय व्यवसायातील सत्प्रवृत्ती आजही आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून काम करीत आहेत.डाक्टर स्वतःला देवाचा अवतार मानीत नसले तरी उपचारासाठी डाक्टरकडे जाणारा रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांच्या नजरेत डाक्टरचे स्थान देवापेक्षा कणभरही कमी नसते.श्रध्दा आणि सबुरीमुळे विश्‍वास ठेवलेला रूग्ण आणि रूग्णासाठी डाक्टरचा प्रत्येक शब्द ब्रम्ह सत्य असते.या विश्‍वासाचा फायदा घेऊन वैद्यकीय व्यवसायातील काही दुष्प्रवृत्ती खुलेआम दरोडेखोरी करू लागली आहे.
नाशिक विभागात अलिकडच्या काळातील दोन घटना या दरोडेखोरीचे जीवंत उदाहरण ठरल्या आहेत.
पहिली घटना आहे अहमदनगर शहरातील.लाल टाकी परिसरात नावारूपाला आलेल्या एका हृदय विकार तज्ञाने आजाराचे खोटे निदान करून रूग्ण आणि रूग्णनातेवाईकांसमोर भितीचा बागुलाबुवा ऊभा केला.प्राप्त माहीतीनुसार लालटाकी परिसरात स्वास्थ  नावाने हर्ट केअर सेंटर मध्ये या रूग्णालयाचे संचालक डा.अभिजीत पाठक यांनी हरिश कटारिया नामक एका रूग्णाचे खोटे निदान करून अँजिओप्लास्टी करण्याची गरज असल्याचे खोटे सांगीतले.दरम्यानच्या काळात उपचारासाठी तब्बल 82 हजार रूपये देखील लाटल्याचा कटारीया यांचा आरोप आहे.हृदयात ब्लाकेज आहे असे खोटे सांगून कटारिया यांच्याकडून लाखो रूपये उकळण्याचा डाक्टरचा हेतू होता.कटारिया यांनी आपल्या बहिणीच्या माध्यमातून पुणे येथील रूबी हास्पिटलमधील हृदय तज्ञांचे  सेंकड ओपीयन घेतल्यानंतर डा.पाठक यांचा डाव उधळला गेला.कटारिया यांच्या हृदयात कुठल्याही प्रकारचे ब्लाकेज नाही.अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता नाही,असा निर्वाळा रूबीच्या वैद्यकीय पथकाने दिल्यानंतर कटारिया यांनी अहमदनगर शहरातील निर्भय नवजीवन फाऊंडेशनशी संपर्क साधला आणि प्रकरणाची खातरजमा करून सदर डाक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन नवजीवन फाऊंडेशनने महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डा.बोरगे यांना दिले आहे.ही घटना उघड झाली म्हणून वाच्यता सुरू आहे.याआधी या हास्पिटल आणखी बर्याच रूग्णांची अशी फसवणूक करून आर्थिक लूट केल्याचे नाकारता येणार नाही.म्हणूनच या आणि या प्रवृत्तीच्या अन्य वैद्यकीय व्यवसायिकांची सखोल चौकशी होणे क्रमप्राप्त आहे.वास्तविक ही घटना उघड झाल्यानंतर शहरातील अन्य व्यवसाय बंधूनी या अप्रान धारी दरोडेखोराच्या विरोधात प्रतिक्रिया देण्यास पुढे येणे आवश्यक होते.या डाक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करीत असतानाच उपचारासाठी लाटलेले 82 हजार सव्याज परत करण्यास भाग पाडणे,मरणाची भिती दाखवून आर्थिक लुबाडणूक करण्याचा प्रयत्न करणे,मानसिकरित्या ओलीस ठेवणे अशा कलमाखाली कारवाई करून वैद्यकीय सनद रद्द करायाला हवी.
दुसरा प्रकार दोन दिवसापुर्वी नाशिक शहरात घडला. वाहतूक शाखेत काम करणारे पवार नामक पोलीस कर्मचारी घरी परतत असतांना त्यांचा अपघात झाला.जाखमी अवस्थेत प्रत्यक्षदर्शींनी त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले.परिस्थिती नाजूक असल्याने तिथून त्यांना एका प्रतिथयश रूग्णालयात हलविण्यात आले.रूग्णालय प्रशासनाने अनामत रक्कम भरल्याशिवाय जखमी अवस्थेतील पोलीस कर्मचार्याला उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला.त्यानंतर त्याच अवस्थेत दुसर्या रूग्णालयात हलविण्यात आहे.सदर रूग्णालय पोलीस पनलवर असतानाही त्या रूग्णालयाने देखील अनामत रकमेचा आग्रह धरून उपचार केले नाहीत .मग नाइलाजास्तव एका खाजगी रूग्णालयात दाखल केले.माञ या दगदगीत अपघातग्रस्त रूग्णाची प्रकृती अधिकच खालावली हौती.अखेर या दुर्दैवी पोलीस कर्मचार्याची प्राणज्योत मालवली.या प्रकरणात खरेतर ते दोन्ही रूग्णालय  पोलीसाच्या मृत्यूला कारणीभुत ठरवून त्यांच्या विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे.जोपर्यंत हे धाडस दाखविले जात नाही तोपर्यंत हा पविञ व्यवसाय या दुष्प्रवृत्तींमुळे आणखी बदनाम होत राहील.हा विचार करून  वैद्यकीय सज्जनांनी पुढे येऊन सृजनशिलता दाखवायला हवी.