0
नवी दिल्ली, दि. 10, सप्टेंबर - रेल्वे हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागासमोर हजर राहणार  नसल्याचे समजते. चारा घोटाळ्याच्या सुनावणीत व्यग्र असल्याने आपल्याला हजर राहता येणार नसल्याचे लालू यांनी अन्वेषण विभागास सांगितले आहे. केंद्रीय गुन्हे  अन्वेषण विभागाने लालू यांना रेल्वे हॉटेल घोटळाप्रकरणी 11 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलो होते. त्यावेळी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री  तेजस्वी यादव यांनाही हजर राहण्याचे आदेश दिले होते. 
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या ताब्यातील रांची आणि पुरी येथील ‘बीएनआर’ हॉटेल्स भारतीय रेलवे खानपान व पर्यटन मंडळाला (आयआरसीटीसी)  चालवायला दिली होती. यानंतर ‘आयआरसीटीसी’ने लालूप्रसाद यादव यांच्या आदेशावरुन निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करुन या हॉटेल्सचे व्यवस्थापन ‘सुजाता  हॉटेल्स प्रा. लि’ या कंपनीकडे सोपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या व्यवहारात लालूप्रसाद यांच्याशी संबंधित ‘डिलाइट मार्केटिंग’ कंपनीला कमी किंमतीत पाटणा  येथील तीन एकर भूखंड मिळाला. 

Post a Comment

 
Top