Breaking News

दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता,भंडारदरा,आढळा पूर्ण भरले

साडेतीन महिन्यात 108 टक्के पाऊस

अहमदनगर, दि. 14, सप्टेंबर - यंदाचा पावसाळा जिल्ह्यासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. गेल्या साडेतीन महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली असून  आतापर्यंत 108 टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. नगर जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 497.4 मिलिमीटर  असून 12 सप्टेंबरपर्यंत 541 मिलीमीटर पाऊस  नोंदला गेला आहे. याशिवाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.त्यात नगर जिल्ह्याचाही समावेश  आहे.दुसरीकडे या पावसाने भंडारदरा धरण 100 टक्के भरले असून इतर महत्त्वाचे प्रकल्पही पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत.
अधिकृत पावसाळा संपण्यास अजून  15  दिवसांची आवश्यकता आहे. त्यामुळे पावसाची सरासरी आणखी वाढण्याची शक्यता आहे.यंदा हवामान खात्याने  पावसाळ्याच्या सुरवातीस 95 टक्के पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता.हा अंदाज बर्‍याच प्रमाणात खरा ठरला आहे. जून महिन्यात सुरूवातीला झालेल्या  चांगल्या पावसाने पेरण्या झाल्या.मध्यंतरी पावसाने ताण दिला होता. त्यामुळे खरिपाच्या पिकांवर परिणाम झाला होता. मात्र पुन्हा पावसाने हात दिल्याने खरिपाच्या  पिकांस जीवदान मिळाले. सध्या सुरू  असलेला पाऊस पाहत रब्बीचा हंगाम चांगला जाईल,असा अंदाज आहे. या पावसाने काही  प्रमाणात तुरी व उडीदाचे नुकसान  झाले आहे.मात्र एंकदिरत जोरदार झालेल्या पावसाने रब्बीच्या पिकांना फायदा होईल,तसेच अनेक ठिकाणच्या तळ्यांना, बंधार्‍यांना पाणी आल्याने काही प्रमाणात  पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होईल.